कल्याण – ठाणे महापालिकेप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत समुह विकास योजना राबविण्यासाठी प्रशासन सर्वाधिक प्रयत्नशील आहे. पालिका हद्दीतील धोकादायक इमारती, चाळी, त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न विचारात घेऊन समुह विकास योजनेच्या माध्यमातून शहराचे वेगवेगळे भाग विकसित करण्यासाठी ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासन पावले उचलत आहे, असे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाचा पुनर्रचना आराखडा तयार करताना आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी नगररचना विभागाच्या प्रमुख साहाय्यक संचालक नगररचना यांना केवळ इमारत बांधकाम परवानग्या, भोगवटा प्रमाणपत्र या विषयांपुरतेच मर्यादित न ठेवता त्यांना चार हजार चौरस मीटर भौगोलिक क्षेत्रापुढील इमारत बांधकाम परवानगीचे अधिकार आणि चार हजार चौरस मीटर खालील अधिकार नगररचना अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या या विकेंद्रीकरणामुळे साहाय्यक संचालक नगररचना यांना नगररचना विभागाशी संबंधित भूसंपादन, समुह विकास, विकास आराखड्यातील रस्ते आणि इतर प्रकल्प विकासाकडे लक्ष देणे यापुढे शक्य होणार आहे. साहाय्यक संचालक नगररचना अधिकारी यांना समुह विकासाची पूर्णवेळाची जबाबदारी देण्यात येणार आहे, असे आयुक्त डाॅ. जाखड यांनी सांगितले.
हेही वाचा >>>कल्याण डोंबिवली पालिकेत जन्म-मृत्यू दाखले मिळण्यास विलंब
विकास आराखड्याचा पूर्ण क्षमतेने विकास, प्रकल्पासाठी भूसंपादन हेही नगररचना विभागाचे काम आहे. आतापर्यंत नगररचना अधिकाऱ्यांनी इमारत बांधकाम परवानग्यांच्या चौकटीत राहुनच आपल्या पुरते काम केले. त्यामुळे या विभागाशी संबंंधित भूसंपादन, विकास आराखड्याचा विकास हे विषय वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिले, अशी माहिती आयुक्त डाॅ. जाखड यांनी दिली.
हेही वाचा >>>कल्याणमधील गांधारी नदीत गाळात अडकलेल्या वृध्द महिलेला वाहतूक पोलिसांनी वाचविले
पालिका हद्दीत धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर आहे. या इमारतींचा समुह विकास (क्लस्टर योजना) योजनेतून विकास करण्यासाठी प्रशासन गंभीर आहे. हा विषय साहाय्यक संचालक नगररचना यांच्या अखत्यारित पूर्ण क्षमतेने देऊन ठाणे पालिकेप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत समुह विकास योजना राबविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे, असे डाॅ. जाखड यांनी सांगितले.
४१ समुह विकास अडचणीचे
कल्याण डोंबिवली पालिकेा हद्दीतील धोकादायक इमारती, चाळी यांचा विचार करून पालिकेने समुह विकास योजना राबवावी म्हणून आपण मागील सहा ते सात वर्षापासून शासनाकडे प्रयत्नशील आहोत. या तगाद्यामुळे पालिकेने कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागांचे एकूण ४१ समुह विकास योजनेसाठी भाग केले आहेत. हे भाग २५ हेक्टर भौगोलिक क्षेत्राचे आहेत. एवढे क्षेत्र कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत उपलब्ध होणार नाही. पालिकेत समुह विकास योजना अंमलात येण्यास प्रस्तावित भौगोलिक क्षेत्र अडथळा आहे. हे क्षेत्र पाच ते सात हेक्टर ठेवले तरच ही योजना पालिका हद्दीत यशस्वी होऊ शकते आणि २५ हेक्टर या एका मुद्द्यावर हा प्रकल्प कधीही आकाराला येणार नाही, असे आपण शासनाला कळविले आहे, असे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी सांगितले.
प्रशासन समुह विकास योजना पालिका हद्दीत राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे. नगररचना विभागाच्या प्रमुखांकडे याविषयीची जबाबदारी देण्यात येणार आहे.-डाॅ. इंदुराणी जाखड,आयुक्त.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.