अंबरनाथमधील विनापरवाना आणि खराब अशा ६० रिक्षांवर कल्याण वाहतूक विभाग आणि अंबरनाथ वाहतूक विभागाने संयुक्त धडक कारवाई केली आहे. या कारवाईच्या वेळी अनेक धूर्त रिक्षाचालकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केल्याने ते या कारवाईत सापडले.
सोमवारी दुपारी या कारवाईस सुरुवात झाली. यावेळी अंबरनाथच्या बी-केबिन, शिवाजीनगर, रेल्वे स्थानक परिसर आदी ठिकाणी पोलिसांनी पहारे उभे करत रिक्षांची तपासणी करण्यास सुरुवात केली. यात १५ रिक्षा पूर्णत खराब आणि ४५ रिक्षाचालकांकडे बॅच, कागदपत्रे नसल्याचे आढळले. यातील १५ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ही कारवाई इथून पुढे नियमित करणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले.