कल्याण– उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या हातगाडी मालकांवर पालिका अधिकाऱ्यांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. उघड्यावरील खाद्य पदार्थांमुळे साथीचे रोग पसरतात. साथ रोगांना अटकाव करण्यासाठी बाजार परवाना, आरोग्य विभागाने पालिका हद्दीतील उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या हातगाडी, फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

डोंबिवली पूर्वेत ग प्रभाग हद्दीत रामनगर, राजाजी रस्ता, शिवमंदिर रस्ता, दत्तनगर, शिवमंदिर, सुनीलनगर, नांदिवली, आयरे भागातील ६० हून अधिक उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या हातगाड्यांवर ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय कुमावत, फेरीवाला हटाव पथकाचे प्रमुख राजेंद्र साळुंखे यांनी कारवाई सुरू केली आहे. इशारा देऊनही जे हातगाडी चालक भेळ, पाणीपुरी, वडा, समोसा इतर तेलकट पदार्थ रस्त्यावर विकत आहेत. त्यांच्या हातगाड्या जप्त करुन अशा फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. काही सराईत हातगाडी चालक सतत सांगुनही खाद्यपदार्थ चोरुन विक्री करत आहेत. त्यांच्या हातगाड्या रस्त्यावर तोडून टाकल्या जात आहेत, असे ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी सांगितले.

हेही वाचा >>> डोंबिवली-कल्याण खड्ड्यात, प्रस्थापित ठेकेदारांकडून निकृष्ट कामे

या आक्रमक कारवाईमुळे ग प्रभागातील उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्री बंद झाली आहे, असे पथकप्रमुख राजेंद्र साळुंखे यांनी सांगितले. ही कारवाई करताना फेरीवाल्यांचे सामान जप्त केले जाते. डोंबिवली पूर्व भागात भरणारा फेरीवाल्यांचा बाजार फ आणि ग प्रभाग अधिकाऱ्यांनी आक्रमक कारवाई करुन बंद केला आहे. फ प्रभाग हद्दीत नेहरु रस्ता, फडके रस्ता, आगरकर रस्ता, कल्याण रस्ता, पाथर्ली, गोग्रासवाडी भागातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी कारवाई सुरू केली आहे. ह प्रभागात साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी महात्मा फुले रस्ता, गुप्ते रस्ता, दिनदयाळ, शहराच्या अंतर्गत भागात सुरू असलेली रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने बंद केली आहेत. डोंबिवली पश्चिमेत रात्री आठ नंतर काही भागात खादय पदार्थ विक्रेते हातगाड्या सुरू करतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीतील नवीन काँक्रीट रस्त्यांची तोडफोड, रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ई प्रभागात भारत पवार यांनी पेंढरकर महाविद्यालय, शिळफाटा रस्ता, मानपाडा रस्ता, काटई चौक, गोळवली परिसरातील हातगाडी चालकांवर कारवाई सुरू केली आहे. आय प्रभागात साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी उघड्यावर खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या जप्तीची कारवाई सुरू केली आहे. १०० फुटी रस्ता, खडेगोळवली परिसरात ही कारवाई नियमित केली जात आहे. अ प्रभागात साहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे यांनी मांडा, टिटवाळा, बल्याणी, मोहने, आंबिवली परिसरातील हातगा्ड्यांवर कारवाई केली. ब प्रभागात राजेश सावंत यांचे पथक खडकपाडा, मुरबाडा रस्ता भागात कारवाई करत आहे. या कारवाईमुळे उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणाऱ्यांची गैरसोय होत आहे. हाॅटेल, उपहारगृहाचा आधार घेऊन या मंडळींना आपले चोचले पूर्ण करावे लागत आहेत.