डोंबिवली-कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील पत्रीपूल ते पलावा चौकापर्यंतची रस्त्याच्या दुतर्फा असलेली १५० हून अधिक प्रकारची लहान मोठी अतिक्रमणे पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकांनी जमीनदोस्त केली. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा होत होता.

हेही वाचा- ठाणे : वाहतूकीस अडथळा ठरणाऱ्या भंगार वाहने हटविण्याची कारवाई सुरुच

शिळफाटा रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहन दुरुस्ती कार्यशाळा, कलिंगड विक्री निवारे, टपऱ्या, भाजीपाला विक्रीचे ठेले उभारण्यात आले होते. हे निवारे पावसाळ्यात विटांचे बांधकाम करुन पक्के केले जातात. त्यामुळे ही बांधकामे पक्की होण्यापूर्वीच आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा असलेली सर्व लहान, मोठी अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याचे आदेश साहाय्यक आयुक्तांना दिले होते.
या आदेशाप्रमाणे ई प्रभागाचे भारत पवार, ग प्रभागाचे संजय साबळे, आय प्रभागाच्या हेमा मुंबरकर, फ प्रभागाचे भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागांमधील ८० हून अधिक कामगारांनी रस्त्या लगतची अतिक्रमणे जमीनदोस्त केली. रस्त्याला अडथळा ठरणारी पक्की बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

हेही वाचा- कल्याणमध्ये धावत्या लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा प्रवाशाच्या मारहाणीत मृत्यू

अनेक वर्षापासून शिळ रस्त्यावर टाटा नाका ते सोनारपाडा दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाला बाजार भरतो. या बाजारामुळे नियमित या भागात वाहतूक कोंडी होते. स्थानिक मंडळी या फरीवाल्यांकडून मलई वसूल करत असल्याने या बाजारावर कारवाई झाली तरी पुन्हा काही दिवसांनी हा बाजार बसविण्यात काही स्थानिक मंडळीच पुढाकार घेतात, असे या भागातील नागरिकांनी सांगितले.

हेही वाचा- ठाणे परिसर वाहतूक कोंडीमुक्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, विकासकामे दोन महिन्यांत पूर्ण करण्याची सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पत्रीपूल, देशमुख होम्स, टाटा पाॅवर, सोनारपाडा, मानपाडा, काटई नाका, पलावा चौक भागातील अतिक्रमणे या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आली. तोडलेले अतिक्रमण पुन्हा उभारण्याचा प्रयत्न फेरीवाला, स्थानिकाने केला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे साहाय्यक आयुक्तांना सूचित केले आहे, असे अतिरिक्त आयुक्त चितळे यांनी सांगितले.