डोंबिवली – डोंबिवली शहराच्या विविध भागांत सोमवारी कल्याण येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि डोंबिवली वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त तपासणी मोहीम राबवून ६२ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली. या रिक्षाचालकांकडून एक लाख ९३ हजार रुपयांचा दंड एका दिवसात वसूल केला.

रिक्षाचालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक सोमवारी दुपारी डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यांवरील पंडित दिन दयाळ रस्ता, पूर्व भागातील टिळक चौक, इंदिरा चौक भागात उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांच्या आदेशावरून मोटार वाहन निरीक्षक अनिल धात्रक, साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नीलेश अहिरे, डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, वाहतूक पोलीस आणि सेवक यांची तपासणी पथके दाखल झाली. त्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना थांबवून त्यांच्या जवळील रिक्षा कागदपत्रांची पडताळणी सुरू केली. यावेळी अनेक रिक्षाचालक शुभ्र धवल, खाकी गणवेश न घालता साध्या वेशात रिक्षा चालवित असल्याचे आढळले. काही चालक रिक्षा वाहनतळ सोडून प्रवासी वाहतूक करत होते. काहींजवळ वाहन परवाना नव्हता. काही चालक मागील आसनावर तीन आणि चालकाच्या बाजूला एक असे चार प्रवासी घेऊन वाहतूक करत असल्याचे आढळले.

हेही वाचा – ठाण्यात श्रमजीवी संघटनेचा मोर्चा

अशा एकूण ६२ रिक्षाचालकांवर मोटार वाहन कायद्याने दंडात्मक कारवाई करून एक लाख ९३ हजार रुपयांचा दंड तीन ते चार तासांच्या कारवाईत वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे काही रिक्षाचालकांनी मार्ग बदलून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही अडवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असे वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.

सुट्टीमुळे अनेक रिक्षाचालकांचे मालक गावी गेले आहेत. अशा मालकांच्या रिक्षा शाळकरी मुलांनी भाड्याने चालविण्यास घेतल्या आहेत. ही मुले रिक्षा वाहनतळावर रिक्षा न थांबविता रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारासमोर रिक्षा वाहनतळ सोडून प्रवासी वाहतूक करतात. या मुलांकडे गणवेश नाहीत. अतिशय सुसाट वेगाने वाहतुकीचे नियम तोडून ते प्रवासी वाहतूक करत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई झाल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा – डोंबिवलीतील देवीचापाडा येथील पर्यटन स्थळ आरक्षणावरील बेकायदा बांधकामांवर कारवाई

डोंबिवलीत वाहतूक विभागाचे प्रमुख गित्ते दररोज दुपारनंतर शहराच्या विविध रस्त्यांवर फेरा मारत असल्याने कारवाईच्या भीतीने रिक्षाचालकांवर वचक राहत आहे. आरटीओ अधिकाऱ्यांनी आठवड्यातून, पंधरा दिवसाने अचानक अशी तपासणी मोहीम राबवून रिक्षाचालकांच्या मनमानीवर अंकुश घालण्याची मागणी प्रवाशांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“डोंबिवलीत काही रिक्षाचालक मनमानी करून बेदरकारपणे रिक्षा प्रवासी वाहतूक करत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून प्राप्त झाल्या होत्या. अशा रिक्षाचालकांवर वचक ठेवण्यासाठी डोंबिवली वाहतूक विभागाच्या साहाय्याने संयुक्त तपासणी मोहीम राबवून डोंबिवलीतील काही रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. ही मोहीम नियमित राबवली जाणार आहे.” – विनोद साळवी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण.