पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर रेसिडेन्ट वेल्फेअर असोसिएशनच्या ५० सदस्यांनी रविवारी सकाळी एमआयडीसी परिसरात झाडांना खिळे ठोकून लावलेले जाहिरात फलक काढले. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक महिला, पुरूष या उपक्रमात सहभागी झाले होते.
यापूर्वी संघटनेतर्फे पर्यावरण दिनानिमित्त डोंबिवली परिसरातील रहिवाशांना मोफत झाडे देण्याचा उपक्रम राबविण्यात येत होता. यावेळी पाऊस सुरू झाला नसल्याने झाडांना ठोकलेले खिळे काढणे आणि झाडांवरील खिळे ठोकलेल्या जाहिराती काढण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारपर्यंत हा उपक्रम सुरू होता.
झाडाच्या उंच भागात लावलेल्या जाहिराती रहिवाशांनी झाडावर चढून, लोखंडी हूकच्या साहाय्याने काढल्या. सुमारे १५० हून अधिक लहान मोठ्या झाडांना खिळे ठोकलेल्या जाहिराती, खिळे काढण्यात आले. शाळकरी मुले हौसेने या उपक्रमात सहभागी झाली होती.

झाडांना इजा करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही अनेक आस्थापना, खासगी शिकवणी वर्ग चालक झाडांना खिळे ठोकून जाहिराती लावतात, अशा संस्थांची माहिती घेऊन त्याची माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या उद्यान अधीक्षकांना देण्यात येणार आहे, असे मिलापनगर रेसिडेन्ट संघटनेच्या वर्षा महाडिक यांनी सांगितले. जमा झालेले् फलक एकत्रित करून कल्याण डोंबिवली पालिकेच्या कचरा विभागाकडे जमा करण्यात आले.
या उपक्रमात प्रसाद कांत, अरविंद टिकेकर, निखिल कुलकर्णी, सुधीर गाडेकर, पुष्कर लोहोकरे, समीर नाईक, स्नेहा नाईक, निखिल लाटकर, मुकुंद कुलकर्णी, माधव सिंग, सुहास वाळके, सुहासिनी वाळके, वर्षा महाडिक, राजू नलावडे, शाळकरी मुले शैवी कांत, रुपेश आंब्रे, मंथन नाईक, रुपेश कोलपटे सहभागी झाले होते.