ठाणे: ठाणेकरांसाठी अभिमानास्पद क्षण ठरला आहे, कारण ठाण्याच्या अवघ्या सहा वर्षांच्या एका चिमुकल्याने जागतिक पातळीवर आपली बुद्धिमत्ता सिद्ध करत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. मलेशियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘आयमा जागतिक चॅम्पियनशिप’ (AIMA World Championship) या आंतरराष्ट्रीय अॅबॅकस आणि मेंटल मॅथ स्पर्धेत त्याने १४ देशांतील ४८८ स्पर्धकांमध्ये बाजी मारत प्रथम क्रमांक मिळवला. लहान वयात मिळवलेल्या या अभूतपूर्व यशामुळे ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मलेशियामध्ये नुकत्या पार पडलेल्या या स्पर्धेत भारतासह तैवान, मलेशिया, इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया, श्रीलंका, चीन, दक्षिण आफ्रिका, पनामा, लेबनॉन, कंबोडिया, इराक आणि रशिया या देशांतील एकूण ४८८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ठाण्याचा अवघ्या सहा वर्षांच्या आदिराज मेस्त्री याने देखील सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत आदिराज मेस्त्री याने आपल्या अपवादात्मक बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या जोरावर जागतिक पातळीवर प्रथम क्रमांक पटकावत ठाण्याचे आणि भारताचे नाव उज्वल केले आहे. याआधीही आदिराजला संपूर्ण भारतात “सुपर चॅम्पियन” म्हणून गौरविण्यात आले होते. विशेष म्हणजे, भारताने या जागतिक स्पर्धेत एकूण ८७ पदके जिंकून दुसऱ्या क्रमांकाचे यश संपादन केले, तर पहिला क्रमांक इंडोनेशियाने मिळवला.
आदिराज मेस्त्री सध्या ठाण्यातील ‘न्यू होरायझन स्कॉलर स्कूल’मध्ये इयत्ता दुसरीत शिक्षण घेत आहे, आणि त्याला ‘वंडर किड्स अकॅडमी’ (मुंबई) येथे प्रशिक्षण मिळत आहे. त्याच्या प्रशिक्षक लीना पाटील, गौरी दौंड आणि अकॅडमी प्रमुख आशुतोष पाटील यांनी आदिराजच्या यशामागे मोठं योगदान दिले आहे.आदिराजचे वडील दिग्विजय मेस्त्री आणि आई अमृता मेस्त्री हे दोघेही महाराष्ट्र राज्याच्या महापारेषण विभागात संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. तसेच, आदिराज हा राजपत्रित अधिकारी अनुराधा मेस्त्री आणि प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राम मेस्त्री यांचा नातू आहे. लहान वयात आदिराजने मिळवलेले हे थोर यश संपूर्ण ठाणेकरांसाठी आणि राज्यासाठी अभिमानास्पद आहे. या कामगिरीसाठी आदिराज मेस्त्री याचे विविध स्तरांमधून कौतुक होत असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आयमा जागतिक चॅम्पियनशिप नक्की कोणती स्पर्धा ?
आयमा जागतिक चॅम्पियनशिप (Abacus & Mental Arithmetic Alliance World Championship) ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धा आहे, जी दरवर्षी विविध देशांतील बाल स्पर्धकांमध्ये आयोजित केली जाते. ही स्पर्धा प्रामुख्याने अॅबॅकस आणि मेंटल अरिथमेटिक या बुद्धिमत्तेच्या आणि गणनाशक्तीच्या कौशल्यांवर आधारित असते. या स्पर्धेत ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांचा सहभाग असतो आणि त्यामध्ये विविध देशांतून आलेले स्पर्धक अचूक आणि वेगवान गणिती कौशल्यांमध्ये आपली चमक दाखवतात. स्पर्धेचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये लक्ष केंद्रीकरण, स्मरणशक्ती, विश्लेषण क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवणे असे आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना आधी त्यांच्या देशातील निवड चाचण्या आणि विविध स्तरांवरील स्पर्धा पार कराव्या लागतात. यानंतरच त्यांना जागतिक स्तरावरील अंतिम फेरीत सहभागी होता येते.