मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोललो नाही तर हातचे विरोधी पक्षनेतेपद पण जाईल या भीतीने अजितदादा पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असल्याची टीका शिवसेनेचे प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केली आहे. ताई आणि दादांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर अनाठायी टीका करण्याची लागलेली स्पर्धा पाहिली की आम्हाला ‘दया कुछ तो गडबड है’ हाच डायलॉग आठवतो असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये खड्ड्यात दुचाकी आपटून टँकरखाली आल्याने चिरडून महिलेचा मृत्यू

विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित दादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातले मोठे नाव आहे. राज्याचे मुख्यमंत्री व्हावे असे त्यांचेही स्वप्न होते. त्यांच्या राजकीय आयुष्यात एकदा तशी संधी त्यांच्यासाठी चालून आली होती. मात्र शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीच्या जास्त जागा निवडून आल्या असतानाही मुख्यमंत्रीपद कॉंग्रेसला देऊ केले, त्यामुळे दादांच्या तोंडचा घास हिरावून घेतला गेला तो कायमचा असे मत म्हस्के यांनी व्यक्त केले आहे.

अजित दादा यांचे रुसवे फुगवे अनेकदा पवार साहेबांना दूर करावे लागले आहेत. यापूर्वी त्यांनी पहाटे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन काकांनाच आव्हान देण्याचा प्रयत्नही करून पाहिला. परंतु, काकांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर दादांचे उपमुख्यमंत्रीपदही गेले. त्यामुळे त्यांच्या मनातील अस्वस्थता आम्ही समजू शकतो. कदाचित त्यामुळेच कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला, तळागाळातून मेहनतीने वर आलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला ही सल कदाचित त्यांच्या मनाला बोचत असावी,अशी टीका त्यांनी केली आहे.

हेही वाचा >>> गणपती बाप्पाला फुलांचा हार आणण्यासाठी गेले, भामट्यांनी ६० हजाराला लुटले ; कल्याण पूर्वेतील कोळसेवाडीतील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या श्रद्धेचेही त्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. शिंदे हे यावर्षीच नव्हे तर गेली अनेक वर्ष पहाटेपर्यत गणपतींच्या दर्शनाला घरोघरी फिरत असतात. मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांचे हात आभाळाला लागलेले नाहीत. पाय जमिनीवरच आहेत हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला वारंवार दिसून येते. त्यामुळे सत्ता गेल्यामुळे आलेल्या वैफल्यातूनच दादा आणि ताई असे आरोप करत असल्याचे मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले आहे.