अंबरनाथः अंबरनाथ पूर्वेतील आनंदनगर औद्योगिक वसाहतीच्या शेजारी काटई अंबरनाथ राज्यमार्गावर पेट्रोल पंपाजवळ एका अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. टँकरच्या चाकाखाली आल्याने झालेल्या भीषण अपघातात तरूणाचा चेंदामेंदा झाला. या भागात रस्ता अरूंद होत असून अतिक्रमणेही वाढली आहेत. बेकायदा पार्किंग, रस्त्यावर आलेल्या अतिक्रमणीत दुकानांचे ग्राहक आणि त्यांची वाहने या सर्वांमुळे येथून मार्गक्रमण करणे कठीण होते. त्यावर पालिका प्रशासन कारवाई का करत नाही असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.
अंबरनाथ पूर्वेला आनंद नगर ही मोठी औद्योगिक वसाहत आहे. शेकडो कारखान्यांतून बाहेर पडणारे दररोज हजारो कामगार अंबरनाथ शहरातून प्रवास करतात. काटई अंबरनाथ राज्यमार्ग ओलांडून ते लोकनगरी मार्गाने हुतात्मा चौक, रेल्वे स्थानक आणि पश्चिमेत मटका चौकातून कल्याण बदलापूर राज्यमार्गावरून रस्ते प्रवास करतात. सायंकाळी काटई अंबरनाथ राज्यमार्गावर वैभव हॉटेलशेजारी चौकात मोठी कोंडी होत असते. औद्योगिक वसाहतीतून बाहेर पडणारे कामगार, त्यांची वाहने, त्याचवेळी काटई मार्गाने मुंबई, ठाण्यातून आलेली वाहने यांची मोठी गर्दी येथे होते. त्यातच अंबरनाथ शहरातून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि बदलापुरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांचीही गर्दी येथे होत असते.
मात्र हा भाग अत्यंत निमुळता आणि ऐन चौकाळ वळणाचा झाला आहे. पेट्रोल पंपापर्यंत दुभाजकाने चार मार्गिका वेगळ्या केल्या आहेत. मात्र अचानक पेट्रोल पंपाशेजारी रस्ता निमुळता होतो. मुख्य रस्त्यावरून येणारी वाहने अरूंद रस्त्यामुळे वळवावी लागतात. त्यामुळे येथे अनेकदा कोंडी होते. अपघातही होत असतात. बुधवारी सायंकाळी काटई राज्यमार्गावरून दुचाकीने येणारा राहुल चव्हाण (२५) घरी जात असताना भरधाव टँकरच्या चाकाखाली आला. या भीषण अपघातात त्याचा जागीत मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी टँकर चालक हाकीम खानला अटक केली. या अपघातानंतर या भागातील अतिक्रमणे आणि कोंडी करणारी वाहने, टपऱ्या, दुकानांचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदावर विराजमान झाल्यानंतर उमाकांत गायकवाड यांनी शहरात अतिक्रमण विरोधी मोहिम उघडली. मात्र पूर्व भागातील या महत्वाच्या रस्त्याकडे अद्याप पालिका प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही. या भागात असंख्य दुकाने, विक्रेत्यांनी दुकाने उघडली आहेत. त्यांचे ग्राहक रस्त्याचा मोठा भाग व्यापतात. शहरातील इतर अनेक अपघातप्रवण चौकांप्रमाणेच हा चौकही अपघाताचा केंद्र बनू लागला आहे. त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होते आहे.