अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. “लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही महायुतीसोबत लढलो आहोत. त्यामुळे नगरपालिकाही महायुतीत लढण्याबाबत शिवसेना आग्रही आहे. पण कुणाला स्वबळाची ताकद आजमावायची असेल, तर आमच्याकडेही पैलवान तयार आहेत,” अशा शब्दांत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे.
सोमवारी अंबरनाथ शहरातील शिवसेनेच्या पाच इच्छुक उमेदवारांच्या शाखा कार्यालयांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या या विधानाने महायुतीतील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला असून, नगरपालिका निवडणुकीतील दोन्ही पक्षांच्या स्वबळाच्या चर्चेला नवे वळण मिळते आहे. गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ शहरात भाजपाच्या वतीने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आल्यानंतर विजयाचे दावे केले जात आहेत. शिवसेनेच्या वतीनेही नगराध्यक्ष पदाचा दावा केला जातो आहे. मात्र या सर्वात महायुतीशिवाय या निवडणुका दोन्ही पक्ष लढणार असल्याचेही स्पष्ट होऊ लागले आहे. दोन्ही पक्षांच्या वतीने उघडपणे तसे सांगितले जात नसले तरी दोन्ही पक्षांकडून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमध्ये हजेरी लावली.
यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. शिवसेना ही महायुतीशी प्रामाणिक आहे. आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढलो आहोत आणि नगरपालिकेतही महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र, कुणी स्वबळाचा आग्रह धरत असेल, तर आमच्याकडेही पैलवान तयार आहेत, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांतील स्थानिक नेते आणि इच्छुक उमेदवार सध्या महायुतीबाबतच्या अंतिम निर्णयाची वाट पाहत आहेत. मात्र उमेदवारांनी स्वबळाप्रमाणेच तयारीही सुरू केली आहे. घरोघरी प्रचार करण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे. प्रचार कार्यालयांचे उद्घाटन करणे, ज्येष्ठ नागरिक, प्रभावी व्यक्तींची भेट घेणे अशा गोष्टी उमेदवारांनी सुरू केल्या आहेत. त्यामुळे स्वबळाची तयारी उमेदवारांनी सुरू केली आहे.
एसआयआर आवश्यक
यावेळी खासदार शिंदे यांनी मतदार याद्यांमधील गोंधळावरूनही भूमिका व्यक्त केली. प्रत्येक निवडणुकीत मतदार यादीतील घोळ नागरिकांना त्रास देतो. त्यामुळे देशभरात सर्वच निवडणुकांसाठी एकच मतदार यादी असावी आणि त्यासाठी एसआयआर प्रणाली लागू करणे गरजेचे आहे, असे शिंदे म्हणाले.
भाजपची भूमिका काय?
शिंदेंच्या या खोचक इशाऱ्यानंतर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, स्थानिक पातळीवरील भाजप कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेच्या वक्तव्याबाबत नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यापूर्वीही जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनीही भाजपच्या भूमिकेचा समाचार घेतला होता.
