अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील शिलाहारकालीन शिवमंदिर परिसर विकास प्रकल्पाच्या टप्प्यात येणाऱ्या प्रकाशनगर झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आज ऑनलाईन पद्धतीने एक महत्वाची बैठक पार पडली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत नुकत्याच सुरू झालेल्या रमाबाई आंबेडकर नगर वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या धर्तीवरच प्रकाशनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन करता येईल का, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीस नगरविकास विभागाचे प्रधान सचिव तथा अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, तसेच अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड उपस्थित होते.
अंबरनाथच्या प्राचीन इतिहासाची एक ठसठशीत ओळख म्हणून शिलाहारकालीन शिवमंदिराकडे पाहिले जाते. अंबरनाथ शहराच्या पूर्व भागात असलेल्या ९६० वर्षांपूर्वीच्या शिलाहार कालीन या प्राचीन शिवमंदिर परिसराचा विकास करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सध्या नगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. यात मंदिर परिसरात विविध सुविधा उभारण्यात येत आहेत. मंदिरा शेजारून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या काठावर घाटाची उभारणी करण्यात येत आहेत. भक्त निवास यासह इतर विविध वास्तू यामध्ये उभारल्या जात आहेत. मात्र या विकास आराखड्याचा काही भाग प्रकाशनगर झोपडपट्टीच्या परिसरात येत असल्याने येथील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करणे अत्यावश्यक झाले आहे.
प्रकाशनगर झोपडपट्टी सुमारे १३,२५८ चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेली असून, या परिसरात ६०० हून अधिक झोपडपट्टी धारक वास्तव्यास आहेत. या भागातील जमीन शासनाच्या विविध आरक्षित भूखंडांवर असल्यामुळे पुनर्वसनाची प्रक्रिया अधिक सुसंगत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी नुकतीच एक बैठक संपन्न झाली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजीत या बैठकीत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव तथा अपर मुख्य सचिव असीम गुप्ता आणि अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाडही उपस्थित होते.
यावेळी नागरिकांचे आणि व्यावसायिक गाळे धारकांचे पुनर्वसन शक्यतो शिवमंदिर परिसराच्या जवळच करावे, अशी सूचना बैठकीत देण्यात आली. यासाठी विस्तृत आणि व्यवहार्य आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या परंपरागत पुनर्विकास पद्धतीच्या व्यतिरिक्त इतर पर्यायांचा शोध घ्यावा आणि स्थानिक परिस्थितीनुसार प्रकाशनगर झोपडपट्टीचा पुनर्विकास शक्य तितक्या वेगाने पुढे न्यायचा, असे बैठकीत ठरले. या चर्चेमुळे अंबरनाथच्या पूर्व भागातील नागरी विकास आणि वारसास्थळ संवर्धन या दोन्ही दिशांनी सकारात्मक पाऊल टाकले गेले असून झोपडपट्टी पुनर्वसन आणि शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पालाही गती प्राप्त होण्याची आशा आहे.