कल्याण– कल्याण पूर्वेतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका १७ वर्षाच्या विद्यार्थीनीचा मानसिक, लैंगिक छळ करुन तिचा विनयभंग करणाऱ्या अंबरनाथ मधील चिखलोली भागातील तरुणाला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी सांगितले, कल्याण पूर्वेत कोळसेवाडी भागात कुटुंबासह राहत असलेली १७ वर्षाची तरुणी याच भागातील एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेते. नियमित महाविद्यालयाला जात असताना, परत येत असताना अंबरनाथ मधील चिखलोली भागात राहणारा राज तिवारी (२१) हा या विद्यार्थीनीचा रस्त्याला पाठलाग करुन तिचा मानसिक, लैंगिक छळ करत होता. नाहक बदनामी नको म्हणून तरुणीने शांत राहणे पसंत केले होते. परंतु, दिवसेंदिवस तरुणाचा त्रास वाढत चालला होता. त्यामुळे तरुणी त्रस्त होती.

हेही वाचा >>> गडचिरोली : प्रियकराच्या मदतीने मुलीनेच केली आईची हत्या

गुरुवारी दुपारी पीडित तरुणी महाविद्यालयातून कल्याण रेल्वे स्थानक भागाकडे येत असताना राज तिवारीने नेहमीप्रमाणे पीडितेचा पाठलाग सुरू करुन, तिला गाठून तिचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला. तरुणीला त्याच्या पासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागताच आरोपी तरुणाने तिला मारहाण करुन तिला धमकी दिली. हा सगळा प्रकार कल्याण पूर्व रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकी जवळ सुरू होता. हा प्रकार सुरू असतानाच, पीडित तरुणीचे वडील तेथे आले. त्यांनी मुलीला कोणी अज्ञात तरुण त्रास देत असल्याचे दिसले. ते मुलीजवळ आले. तिने वडिलांना घडला प्रकार सांगितला. वडिलांनी मुलीला कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेऊन मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला. लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे तिकीट घर परिसरात फिरत असलेला राज तिवारी याला तात्काळ अटक केली. पोलिसांनी त्याला कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आंधळे यांनी सांगितले.