कल्याण – कल्याण जवळील अदानी सुमहाच्या आंबिवली परिसरातील जागेत अदानी सिमेंट बिझनेसतर्फे अंबुजा सिमेंट प्रक्रिया प्रकल्पाची २६.१३ हेक्टर जमिनीवर उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाविषयी नागरिकांच्या सूचना हरकती जाणून घेण्यासाठी जनसुनावणीचा कार्यक्रम एनआरसी शहाड भागात मंगळवारी आयोजित केला होता. या जनसुनावणीच्यावेळी स्थानिक रहिवाशांबरोबर पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या सिमेंट प्रकल्पांमुळे होणारे हवा, जल प्रदुषणाच्या विषयावरून या प्रकल्पाला आमचा जोरदार विरोध असेल, असा इशारा उपस्थित महसूल आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला.

मोहने, आंबिवली, अटाळी, टिटवाळा, मांडा, गाळेगाव, शहाड परिसरातील नागरिक, तसेच राजकीय, पर्यावरणप्रेमी नागरिक अधिक संख्येने या जनसुनावणीला उपस्थित होते. अभ्यासपूर्ण पध्दतीने बहुतांशी उपस्थितांनी आपली मते जनसुनावणीत मांडली. ही सर्व मते एक अहवालाच्या माध्यमातून शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत, असे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.

जनसुनावणीला सुरूवात होताच आंबिवली भागातील अदानी समुहाचा सिमेंट प्रकल्प कशाप्रकारे असेल. त्यामुळे जल, हवा प्रदूषण कसे होणार नाही. या प्रकल्पाच्या बाहेर एकही सांडपाण्याचा थेंब जाणार नाही. या प्रकल्प भागात ९.६७ हेक्टरचा हरितपट्टा विकसित केला जाणार आहे. याशिवाय १९ हजार ३४० झाडांचे रोपण या भागात केले जाणार आहे. नागरिकांच्या जीविताचा विचार करून प्रदुषणमुक्त असा हा प्रकल्प असेल अशी दृश्यध्वनी चित्रफित यावेळी समुहाकडून दाखवली गेली. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी हा प्रकल्प दीर्घकालीन प्रदूषण करणारा असल्याने आपला या प्रकल्पाला विरोध आहे आणि आपण स्थानिक रहिवाशांच्या सोबत आहोत. या प्रकल्पाच्या विरोधात नागरिकांनी आंदोलन उभारले तर आपण त्यात सहभागी होऊ असे सांगितले.

या प्रकल्पाच्या परिसरात पाचशे ते एक हजार मीटरवर उल्हास, काळू, भातसा नदी आहेत. कल्याण, डोंबिवली, निम्म ठाणे जिल्ह्याचे हे पाणी पिण्याचे स्त्रोत आहेत. हे जलस्त्रोत या प्रकल्पामुळे प्रदुषित होतील. या भागात शाळा, महाविद्यालये, धार्मिक संस्था आहेत. रेल्वे स्थानके आहेत. त्यांना या प्रकल्पाची प्रदूषणाच्या माध्यमातून झळ बसेल. हा विनाशकारी प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प या भागात नको, अशी मते नागरिकांनी जनुसुनावणीत मांडली.

स्थानिक रहिवाशांनी हा प्रकल्प होत असल्याच्या जागेच्या किमती अद्याप आम्हाला यापूर्वीच्या कंपनीने दिल्या नाहीत. त्यामुळे आता नव्याने या भागात सिमेंट प्रकल्प होत असेल तर त्याला आमचा कडाडून विरोध आहे. आमची भातशेती, गाई, म्हशी या प्राण्यांना या प्रकल्पापासून धोका आहे, असे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. प्रकल्पाच्या विरोधात नागरिकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती. तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रकल्पामुळे १० किलोमीटर परिसरातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ तालुक्यातील गावे प्रभावीत होणार आहेत. केंद्रीय पर्यावरण विभागाच्या सूचनेप्रमाणे ही जनसुनावणी घेण्यात आली.

या सिमेंट प्रकल्पामुळे जल, हवा प्रदुषित होईल. त्याच बरोबर विविध प्रकारच्या गंभीर आजारांना निमंत्रण या प्रकल्पामुळे मिळणार आहे. उल्हास नदी वाचविण्यासाठी आम्ही जीवाचे रान करतो आणि आता या सिमेंट प्रकल्पाचे सांडपाणी उल्हास नदीत येणार आहे. त्यामुळे या प्रदुषणकारी प्रकल्पाला आमचा कायम विरोध असणार आहे. – नितीन निकम, उल्हास नदी बचाव कार्यकर्ते.

या प्रकल्पामुळे या भागातील जैवविविधतेवर दूरगामी परिणाम होईल. प्रकल्प उभारणीपूर्वी कितीही काळजी घेतली तर नंतर मग प्रदूषण सुरू झाली की नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यास कोणीही पुढे येत नाही. आरोग्याचा विचार करता असे प्रकल्प शहरांजवळ घातक आहेत. – रूपाली शाईवाले, पर्यावरणप्रेमी.

या प्रकल्पामुळे जमिनीची सुपिकता नष्ट होईल. नागरिकांचे पाणी पिण्याचे जलस्त्रोत दूषित होणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार आहेत. – श्रीनिवास घाणेकर, पर्यावरणप्रेमी.