डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात पाटकर रस्त्यावरून जात असताना कॅनरा बँकेच्या एटीएमजवळ रुग्णवाहिकेचा रस्ता अडवून धरणाऱ्या रिक्षा चालकांवर डोंबिवली वाहतूक विभागाने शनिवारपासून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे पाटकर रस्त्यावर स्कायवाॅकचा उतार जिना दोन्ही बाजुन अडवून ठेवणाऱ्या रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत.

वाहतूक पोलीस सकाळी सात वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत या भागात तैनात राहत असल्याने रुग्णावाहिकेला रस्ता न देणारे आणि मागील काही वर्षापासून पाटकर स्त्यावरील रेल्वे स्थानकातून आलेल्या स्कायवाॅकचा उतार जिना अडवून ठेवणारे रिक्षा चालक गायब झाले आहेत. हे रिक्षा चालक वाहनतळावर उभे राहून रेल्वे स्थानकातून येणारे प्रवासी झटपट मिळतील या अपेक्षेने पाटकर रस्त्यावरील स्कायवाॅकच्या जिन्याजवळ दोन्ही बाजुन रिक्षा उभ्या करून प्रवाशांचा रस्ता अडवून उभे राहत होते.

प्रवाशांनी जाण्यासाठी रस्ता ठेवण्याची मागणी केली तरी हे रिक्षा चालक त्या प्रवाशाला उलटसुलट उत्तरे देत होते. अनेक वर्ष या रिक्षा चालकांची मनमानी होती. हे रिक्षा चालक कोणत्याही रिक्षा संघटनेचे सदस्य नसल्याने रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांना या रिक्षा चालकांना काही बोलता येत नव्हते. कॅनरा बँक एटीएमसमोरील रिक्षा चालकांवर कठोर कारवाई करण्याची प्रवाशांची अनेक वर्षाची मागणी होती.

मागील दोन दिवसापूर्वी एक रुग्णवाहिका चालक पाटकर रस्त्याने कॅनरा बँकेच्या एटीएम जवळून रुग्ण घेण्यासाठी चालला होता. हा रुग्णवाहिका चालक वाहनावरील इशारा भोंगा देत वेगाने जात होता. कॅनरा एटीएम बँकेजवळून जात असताना पाटकर रस्त्याच्या दोन्ही बाजुला स्कायवाॅक जिन्याच्या दोन्ही बाजुला रिक्षा आडव्या तिडव्या चालकांनी उभ्या केल्या होत्या. रुग्णवाहिका चालक समोरून येत आहे. त्यामुळे त्याला रस्ता मोकळा करून देणे हे रिक्षा चालकांचे काम होते. याऊलट रिक्षा चालक रुग्णवाहिका चालकाला याठिकाणी रस्ता नाही. तु दुसऱ्या मार्गाने जा, अशी सूचना करत होते.

या भागातील व्यापारी, पादचारी रिक्षा चालकांना रुग्णवाहिका चालकाला रस्ता मोकळा करून द्या. त्याला अत्यवस्थ असलेला रुग्ण रुग्णालयात घेण्यासाठी जायचे आहे, असे सांगत होते. मुजोर रिक्षा चालक व्यापारी, नागरिकांबरोबर रुग्ण वाहिकेच्या चालकालाही दाद देत नव्हते. अखेर काही जागरूक नागरिक पुढे आले. त्यांनी आक्रमक भूमिका घेत रिक्षा चालकांना रिक्षा बाजुला घेण्यास भाग पाडले. तेव्हा रुग्णवाहिकेचा या भागातील मार्ग मोकळा झाला.

ही माहिती डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांना समजताच, त्यांनी वाहनतळ सोडून पाटकर रस्त्यावर कॅनरा एटीएमजवळ स्कायवाॅकचा जिना अडवून उभ्या राहणाऱ्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी पंधराहून अधिक रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरूच आहे. या भागात आता सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वाहतूक पोलीस तैनात असतो. पाटकर रस्त्यावरील रिक्षा चालकांची घुसखोरी बंद झाल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत.