कल्याण – कल्याण पूर्वेतील मलंग गड रस्त्यावरील व्दारली गाव हद्दीत पालिकेच्या परवानग्या न घेता उभारण्यात आलेली चार माळ्यांची बेकायदा इमारत जेसीबीच्या साहाय्याने शुक्रवारी भुईसपाट करण्यात आली. इमारत पाडताना धुळीचे लोट तयार होऊ नयेत म्हणून धूळ शमन यंत्राचा प्रभावी वापर करण्यात आला.
कल्याण पूर्वेतील आय प्रभागाच्या हद्दीत गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत भुईसपाट करण्यात आलेली ही पाचवी इमारत आहे. व्दारली येथे मेसर्स कृष्णा कन्स्ट्रक्शनचे भागीदार पंडित तुकाराम पाटील आणि इतर भागीदारांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता बेकायदा इमारत उभी केली आहे, अशा तक्रारी आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याकडे आल्या होत्या.
हेही वाचा – मुंबई : दहिसरमध्ये जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाण्याची नासाडी
ही इमारत एक उंच टेकडीवर धोकादायक स्वरुपात बांधण्यात आली होती. जलमल निस्सारणाची कोणतीही सुविधा तेथे नव्हती. पालिकेच्या परवानग्या या इमारतीला नसल्याचे निदर्शनास आल्यावर आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्य्क आयुक्त मुंबरकर यांनी शुक्रवारी पंडित पाटील यांची बेकायदा इमारत जेसीबीच्या साहाय्याने दोन तासांच्या कारवाईत भुईसपाट केली.
या इमारतीच्या बाजूला गोधनासाठी लागणाऱ्या हिरव्या चाऱ्याचा मळा होता. या मळ्यावर धूळ पसरणार नाही याची काळजी यावेळी घेण्यात आली होती. धूळ शमनाचे सर्व नियम पाळून ही इमारत पाडण्यात आली, असे मुंबरकर यांनी सांगितले.
सर्व प्रभागांमध्ये बेकायदा बांधकामे तोडण्याची जोरदार मोहीम सुरू असताना डोंबिवली पश्चिमेत मात्र पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण देऊन बेकायदा बांधकामे, टपऱ्या, पदपथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांना अभय देण्याच्या तक्रारी वाढत आहेत. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी ह प्रभाग कार्यालयात बेकायदा बांधकामे, फेरीवाले, पदपथ अडवून बसलेले व्यापारी यांच्यावर कारवाई सुरू आहे की नाही याची माहिती घेण्याची मागणी तक्रारदारांकडून केली जात आहे. ह प्रभागातील कारभाराविषयी आपण आयुक्त जाखड यांची भेट घेणार आहोत, असे निर्भय बनो संस्थेचे महेश निंबाळकर यांनी सांगितले.