बदलापूर आणि अंबरनाथ शहराच्या बहुतांश भागात आज (सोमवार) सकाळी पसरलेल्या राखेमुळे एकच खळबळ उडाली. घराबाहेर मोकळ्या जागेत, रस्त्यांवर, पार्कींगमधील वाहनावर, झाडांवर सगळीकडे राखच राख दिसत होती. त्यामुळे हा काय प्रकार आहे, अशा चर्चा रंगू लागल्या.

त्यानंतर मध्यरात्री अंबरनाथच्या एका कागद पुनर्प्रक्रिया करणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग लागल्याची माहिती समोर आली. या आगीमुळे ही राख पसरल्याची शक्यता व्यक्त होऊ लागली. अंबरनाथच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील पद्मावती पेपर कंपनीच्या गोदामाला ही आग रात्री एकच्या सुमारास लागली होती. या आगीची माहिती मिळताच औद्योगिक वसाहतीतील एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने या आगीवर नियंत्रण मिळवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

… त्यामुळे मोठा अनर्थ टळला –

पद्मावती पेपर कंपनीच्या मागच्या बाजूस असलेल्या साठा करून ठेवलेल्या कागद, पुठ्ठ्यांच्या गोदामाला ही आग लागली होती. रात्री एकच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वतीने देण्यात आली आहे. कंपनीच्या इतर भागात सुदैवाने ही आग पसरली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पद्मावती ही कागद पुनर्प्रक्रिया करणारी एक मोठी कंपनी असून प्रक्रियेसाठी लागणारा कागद आयात करण्याची वेळ या कंपनीवर अनेकदा येते. या कंपनीच्या लागलेल्या आगीतून उडालेली ही राख अंबरनाथ आणि बदलापुरात पसरल्याचे बोलले जाते आहे. मात्र कोणत्याही शासकीय संस्थेने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिला नाही.