ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम आता वेगाने सुरू असले तरी गेले काही वर्षे भुसंपादनास मान्यता मिळत नसल्याने प्रकल्पाच्या काम रखडल्याचे चित्र होते. यावरूनच केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव ( Ashwini Vaishnaw ) यांनी प्रकल्प दिरंगाईचे खापर उद्धव ठाकरेंवर फोडले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाला म्हणजेच मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सुमारे ५०८ किलोमीटर लांबीचा आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे प्रकल्पाचे काम करण्यात येत असून या प्रकल्पात एकूण १२ स्थानके असून, त्यात मुंबई, ठाणे, विरार, बोइसर, वलसाड, सूरत, भरुच, वडोदरा, आनंद आणि अहमदाबादचा समावेश आहे. ठाणे–शिलफाटा विभागात तब्बल २१ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार होत असून, त्यातील ७ किलोमीटर भाग हा समुद्राखालील बोगदा आहे.
जपानकडून मिळालेल्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारला जात असून या प्रकल्पाचा खर्च अंदाजे १.०८ लाख कोटी आहे. या प्रकल्पातील शिळफाटा बोगद्याच्या ब्रेकथ्रू कार्यक्रम शनिवारी केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पार पडला. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) तर्फे घणसोली येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी मंत्री वैष्णव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरेंवर खापर
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातून निघणारा बुलेट ट्रेनचा मार्ग नवी मुंबईतील महापे-आडीवली भुतवली भागातून पुढे शीळ, डायघर भागातून म्हातार्डी येथून पालघर जिल्ह्य़ाच्या दिशेने प्रस्तावित आहे. त्यात ठाणे महापालिका क्षेत्रातील शीळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावांतील जमीन बाधीत होत आहे. या जमीन संपादन प्रक्रीयेच्या मान्यतेस उशीर झाला होता. यामुळे या प्रकल्पास झालेल्या दिरंगाईवरून मंत्री वैष्णव यांनी खापर ठाकरेंवर फोडले आहे.
मंत्री वैष्णव काय म्हणाले
महाराष्ट्रात ठाकरे सरकार जोपर्यंत होते, तोपर्यंत त्यांनी प्रकल्पास परवानगी दिली नव्हती. या कारणास्तव प्रकल्पाच्या कामास उशीर झाला आहे, ते काम आता उरकण्यावर भर देण्यात येत आहे. हे काम लवकर कसे करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच परवानगी दिली नसल्यामुळे या प्रकल्पाच्या खर्चात नेमकी किती वाढ झाली, याचाही सविस्तर अभ्यास करण्यात येत आहे, असे सांगत मंत्री वैष्णव यांनी प्रकल्प दिरंगाईचे खापर ठाकरे सरकारवर फोडले आहे.