ठाणे: पाचपाखाडी येथे नव्याने प्रतिष्ठापना झालेल्या तुळजापूर मंदिराजवळ एका आलीशान मोटारीच्या धडकेत पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मी काळे असे मृत मुलीचे नाव आहे. तर तिची तीन वर्षांची बहीण देखील या घटनेत जखमी झाली आहे.
याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात मोटार चालक राम माळी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. या मोटारीवर तो चालक म्हणून काम करत आहे.
पाचपाखाडी येथील नामदेव वाडी परिसरात तुळजापूर मंदिराची प्रतिष्ठापना बुधवारी होती. त्यामुळे लुईसवाडी भागात राहणाऱ्या बेलदाबाई पवार या कप-बशी विक्रीसाठी मंदिर परिसरात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांची नातवंड (मुलीच्या मुली) लक्ष्मी आणि गंगुबाई या देखील होत्या. बुधवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास त्या व्यवसाय झाल्यानंतर घरी जाण्यास निघाल्या होत्या. त्यावेळी लक्ष्मी आणि गंगुबाई यांना खाण्यास हवे असल्याने बेलदाबाई यांच्याकडून त्यांनी १० रुपये घेतले.
मंदिराजवळी एका टपरीवर खाण्याचा पापड आणण्यासाठी दोघी गेल्या. रस्ता ओलांडत असताना एका भरधाव आलीशान मोटारीने त्यांना धडक दिली. या धडकेत लक्ष्मी हिला गंभीर दुखापत झाली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. परिसरातील नागरिकांनी तात्काळ दोघींना परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
डाॅक्टरांनी लक्ष्मी हिला तपासून मृत घोषित केले. गंगुबाई हिच्या देखील हाता-पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी मोटारीमधील चालक राम माळी याच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या मोटारीवर तो चालक म्हणून काम करतो. त्याला नोटीस बजाविण्यात आल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.