कल्याण – कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा भागात शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी रात्री १५ जणांच्यामध्ये पूर्ववैमनस्यातून हाणामारी सुरू होती. तुंबळ हाणारी सुरू असल्याने माजी नगरसेवक बोरगावकर आणि त्यांचे समर्थक ओंकार सपाट आणि ज्ञानेश्वर सपाट तो वाद सोडविण्यासाठी मध्य पडले. दोन्ही गटांना बाजुला केल्यानंतर या हाणामारीतील जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातून बाहेर पडल्यावर दबा धरून बसलेल्या एका गटाने शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्या वाहनाला घेरून वाहनावर तुफान दगडफेक आणि वाहनाच्या बाह्य भागाला लाथा मारून वाहनाचे नुकसान केले.
या दगडफेकीच्या हल्ल्यात वाहनाचा काचा फुटल्या. काही दगड वाहनातील माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, सपाट बंधूंना लागले. एकावेळी पंधरा हल्लेखोरांनी बोरगावकर यांच्या वाहनाला घेरले आणि हल्ला केल्याने त्यांना बचावाचा पवित्रा घेता आला नाही. सपाट बंधूंना दगडीचे घाव वर्मी बसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बोरगावकर यांनी स्वतासह आपल्या समर्थकांवर १५ जणांनी एकावेळी हल्ला केल्याची आणि वाहनाची तोडफोड केल्याची तक्रार महात्मा फुले पोलीस ठाण्यात केली आहे. शिंदे शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याने कल्याणमधील शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते बेतुरकरपाडा येथील माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्या कार्यालयात पोहचले. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते.
उमेश बोरगावकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले, या दोन्ही गटात यापूर्वी दसरा सणाच्या काळात वाद झाला होते. त्यांच्यात पूर्वीपासून काही वाद आहे. भांडण करणारा गट हा मुरबाड तालुक्यातील आहे. आपल्या कार्यालयासमोर दोन गटात वाद सुरू होता. म्हणून आपण तो वाद सोडविण्यासाठी समर्थकांसर पुढे आलो. दोन्ही गटांना बाजुला केले. त्यात जखमी होते. त्यांना रुग्णालय आणि पोलीस ठाणे आवश्यक असल्याने ती धावपळ केली. जखमींना आपल्या वाहनात घेऊन त्यांना पहिले रुग्णालयात उपचारासाठी नेले.
रुग्णालयातून बाहेर पडल्यावर दबा धरून बसलेल्या सुमारे १५ हल्लेखोरांनी अचानक आमच्या वाहनावर दगडफेक सुरू केली. वाहनाला घेरून लाथाबुक्क्या वाहनाच्या बाह्य बाजुला मारल्या. या हल्ल्यात आपल्या वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. इतर भागाचे नुकसान झाले आहे. समाजसेवा म्हणून पुढे आलो तर हल्लेखोरांनी आपणास नाहक लक्ष्य केले, असे बोरगावकर यांनी सांगितले. आपणास कमी मार लागला पण आपले कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत, असे बोरगावकर यांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.