Ghodbunder Road : ठाणे : घोडबंदर मार्ग हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पंरतु या मार्गावर ठाणे पोलिसांनी आज रात्रीपासून पुढील २३ दिवसांसाठी मोठे वाहतुक बदल लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कापूरबावडी परिसरातील मुख्य मार्गावरील वाहतुक पूर्णत: बंद केली जाणार आहे. येथील मेट्रोच्या कामामुळे हे वाहतुक बदल लागू केले जाणार आहे. त्यामुळे मध्यरात्री आणि पहाटे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या चालकांना कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

घोडबंदर मार्गावरून (Ghodbunder Road) हजारो जड अवजड वाहने उरण जेएनपीए येथून गुजरातच्या दिशेने वाहतुक करतात. या भागात मोठ्याप्रमाणात नागरी वस्ती आहे. त्यामुळे हलक्या वाहनांची वाहतुक देखील या मार्गावरुन होत असते. कामानिमित्ताने मुंबईत जाणाऱ्या वाहन चालकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. मागील काही वर्षांपासून या मार्गावर वडाळा-घाटकोपर-कासारवडवली (मेट्रो चार) प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यालगत आणि मुख्य मार्गिकेतील दुभाजकावर अडथळे बसविले आहे. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर बसत आहे. त्यात या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने कोंडीत आणखी भर पडत असते. मेट्रो मार्गिकेच्या कामाचा भाग म्हणून येथील कापूरबावडी जंक्शन भागात सिमेंट गर्डर उभारले जाणार आहे. या कालावधीत क्रेन मुख्य मार्गावर, उड्डाणपूलावर उभ्या केल्या जाणार असल्याने ठाणे वाहतुक पोलिसांनी कापूरबावडी जंक्शन येथून ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणारी मार्गिका पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उड्डाणपूलावरील वाहतुकही बंद असणार आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी येथील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविली असून त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर बसण्याची शक्यता आहे.

कसे आहेत वाहतुक बदल?

मुंबई, ठाणे शहरातून माजिवडा पूलावरून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांना ज्युपिटर वाय जंक्शन येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने उड्डाणपूलाखालील मार्गाने कापूरबावडी चौक, नंदीबाबा, ढोकाळी मार्गे वाहतुक करतील, किंवा पोखरण रोड क्रमांक दोन येथून वाहतुक करण्यास नागरिकांना परवानगी असेल.

– हे वाहतुक बदल १७ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत दररोज रात्री ११ ते पहाटे ५ या कालावधीत लागू असतील. अत्यावश्यक वाहनांना हे वाहतुक बदल लागू नसतील असे पोलिसांनी स्पष्ट केले.