वसई, गुजरातच्या जांभळांचा बाजारावर ताबा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सागर नरेकर, बदलापूर

गेल्या अनेक वर्षांपासून अस्सल, रसदार आणि गोड जांभळांसाठी प्रसिद्ध असलेला बदलापूरचा हलवी आणि गरवी जातीचे जांभूळ बाजारातून गायब झाले आहेत. या जांभळांची आता वसई, पालघर आणि गुजरात राज्यातून येणाऱ्या जांभळांनी घेतली असली तरी विक्री मात्र बदलापूरचा जांभूळ याच नावाने होत आहे. मूळचा बदलापूरच्या जांभळाचे उत्पन्न  दिवसागणिक घटत असून यंदाही ते कमीच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

बदलापूर शहर हे आपल्या निसर्गसौंदर्याने प्रसिद्ध होण्यापूर्वीपासून येथील जांभळांच्या बाजारांमुळे प्रसिद्ध होते. बदलापूर शहराच्या आसपास असलेल्या सोनिवली, एरंजाड, काराव, डोणे, बोराडपाडा, मुळगाव, बारवी धरण परिसरातून आदिवासी बांधव जांभूळ काढून बदलापुरात विक्रीसाठी येत असत. यात हलवी किंवा हलवा आणि गरवी किंवा गरवा अशा जांभळांच्या दोन जाती प्रसिद्ध आहेत. मुंबईचे अनेक मोठे व्यापारी वर्षांनुवर्षे बदलापुरात जांभळांच्या घाऊक खरेदीसाठी येत. काही वर्षांपासून जांभळांचा बदलापुरातील हा बाजार शेवटची घटका मोजू लागला आहे.

महालक्ष्मी तलावाच्या किनारी या जांभळाची खरेदी आणि विक्री होत असते. गेल्या काही वर्षांत यात घट आली आहे. पूर्वी ६० ते ७० पाटी जांभूळ विक्रीसाठी येत असत. सध्या दिवसाला दोन ते तीन पाटय़ा जांभूळ येततात, असे येथील सर्वात जुने आडते कल्लू खान यांनी सांगितले. उत्पन्नच घटल्याने मुंबईचा जांभूळ खरेदीदार आता बदलापुरात येणे बंद झाला आहे, असेही खान यांनी सांगितले. एप्रिल महिन्यात अचानक आलेल्या पावसामुळे बहुतांश जांभळांचे नुकसान केले आहे. आधीच कमी असलेली आवक आणखी कमी झाल्याचे खय्यम खान यांनी सांगितले. जवळच्या सोनिवली, एरंजाड भागात मोठय़ा प्रमाणावर गृहसंकुले उभी राहिली आहेत. ती उभारताना अनेक जांभळांच्या झाडांचा बळी गेल्याने जांभळांच्या आवकेवर परिणाम झाला असल्याचे खान यांनी सांगितले. जांभळाचे उत्पन्न कमी झाल्याने अडत्याकडे देण्याऐवजी आदिवासी महिला स्वत:च जांभळांची विक्री करू लागल्या आहेत. या सर्व गोष्टींमुळे येत्या काही वर्षांत बदलापुरातले प्रसिद्ध हलवी आणि गरवी जांभळांचे उत्पादन बंद होण्याची भीती व्यक्त होते आहे.

भलत्याच नावावर जांभळांची विक्री

बदलापूरच्या जांभळाची ख्याती जुन्या घाऊक बाजारांमध्ये कायम आहे. नवी मुंबई आणि मुंबईच्या बाजारात बदलापुरच्या जांभळाला मागणी असून तसा पुरवठाही सुरू असल्याचे समोर आले आहे. मात्र हा जांभूळ वसई, पालघर तसेच गुजरातमधून मुंबईत येत असल्याचे कल्लू  खान यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur famous jamun disappear from market
First published on: 15-05-2019 at 01:51 IST