बदलापूर : धूर फवारणीचे काम मिळवण्यासाठी एका कंत्राटदार कंपनीने अनुभवाचे बनावट प्रमाणपत्र जोडल्याचे समोर आल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात संबंधित कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धूर फवारणीच्या कामात कुळगाव बदलापूर नगरपालिकेची ८१ लाख ९५ हजार ८०६ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात प्रभागनिहाय धूर फवारणीसाठी २०२०-२१ या वर्षात करीता पालिकेने निविदा मागवल्या होत्या. या प्रक्रियेत पाच कंत्राटदार कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील मे. शुभम महीला विकास मंडळ, ठाणे यांनी सादर केलेले कागदपत्रात ठाणे महानगर पालिकेचा तीन वर्षाचा धुर फवारणी अनुभव असलेले प्रमाणपत्र निविदेसोबत जोडले होते. या प्रमाणपत्राच्या आधारे या कंत्राटदार कंपनीला कुळगांव बदलापुर नगरपालिकेकडून धूर फवारणी कामाचे कार्यादेश देण्यात आले. परंतु काही महिन्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी या कंत्राटदार कंपनीने सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आणले होते.
हेही वाचा : डोंबिवलीत उमेशनगरमध्ये जलवाहिनीच्या व्हाॅल्व्हवर झाकण नसल्याने अपघात
या प्रकारानंतर कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने याबाबत चौकशी सुरू केली. अर्जातील आक्षेपांची प्राथमिक चौकशी करून मे. शुभम महीला विकास मंडळ ठाणे यांनी प्राप्त केलेल्या धूर यंत्रणाद्वारे डास प्रतिबंधक धुर फवारणी अनुभव प्रमाणपत्राची ठाणे महापालिका आयुक्तांकडून फेरतपासणी करण्यात आली. त्यानंतर हे अनुभव प्रमाणपत्र हे खोटे व बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नगरपालिकेने संबंधित कंपनीकडून फसवणूक झाल्याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात ८१ लाख ९५ हजार ८०६ रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : डोंबिवलीत सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणी सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल
मे. शुभम महीला विकास मंडळ, ठाणेच्या संचालिका पाटणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी तत्कालीन अधिकारी यांची समिती दोषी असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून फसवणुकीची रक्कम वसूल करावी अशी मागणी तक्रारदार माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केली आहे. तर फक्त कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांना मोकाट सोडण्यात आले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी केला आहे.
पालिकेची फसवणूक
“धूर फवारणी कंपनीला ८ ते ९ महिन्यांचा अनुभव होता. परंतु त्यांनी अटीनुसार ३ वर्षांच्या अनुभवाचा बनावट प्रमाणपत्र सादर केले. ही बाब लक्षात आल्याने गुन्हा दाखल केल्याची प्रक्रिया केली. त्यांचे काम थांबवण्यात आले असून नवीन कंपनी नेमली जाणार आहे.” – योगेश गोडसे, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका.