बदलापूरः राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्याविरूद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. याच धर्तीवर बदलापुरात शनिवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ छाटून आणणाऱ्या व्यक्तीला पाच लाख रूपयांचे बक्षिस दिले जाईल, असेही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात आले. यावेळी जयंत पाटील यांच्या प्रतिमेला दुग्घाभिषेख घालण्यात आला.
काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक ठिकाणी गोपीचंद पडळकर यांच्याविरूद्ध आंदोलने करण्यात आली. बदलापूर शहरातही पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी बदलापूर पश्चिमेत शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने आंदोलन करत पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. त्याचवेळी जयंत पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी थेट पडळकर यांची जीभ कापून आणणाऱ्याला बक्षिस जाहीर केले.
आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अशा कोणत्याही प्रतिक्रिया, वक्तव्यांना जशास तसे उत्तर देईल. भाजपच्या कोणत्याही नेत्याने आता आमच्या नेत्यांविरूद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास आम्ही सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी अविनाश देशमुख यांनी दिली. गोपिचंद पडळकरांचे वय नाही तितके आमच्या नेत्यांचा अनुभव आहे. अशा वाचाळविरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन आहे का, असाही प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
त्यामुळे आम्ही असे जाहीर करतो की जो गोपीचंद पडळकर यांची जीभ छाटून आणेल, त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने ५ लाख रूपये देऊ, असे अविनाश देशमुख यांनी यावेळी सांगितले. ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची संस्कृती नाही. मात्र आमच्या सहनशिलतेचा अंत होतो आहे. त्यामुळे आम्ही ही घोषणा करत आहोत, अशी प्रतिक्रियाही यावेळी प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी दिली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याविरूद्ध राज्यभरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने निषेध केला जातो आहे. त्याची झलक बदलापुरात नुकतीच पाहायला मिळाली. या आंदोलनात महिला, पुरूष कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पडळकर यांच्याविरूदध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.