बदलापूरः एकीकडे भारतीय टपाल खाते अद्ययावतीकरणाची जाहिरात करत असले तरी बदलापूर शहरातील टपाल कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे आणि उद्धट कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांनाच त्यांची पत्रे शोधत कार्यालय गाठावे लागते आहे.
पोस्टमन नागरिकांची पत्रे पोहोचवण्यात कसूर करत आहेत. मूळ पत्त्यावर न जाताच खोटे शेरे टाकून नागरिकांना कार्यालयाचे खेटे मारावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे स्पीड पोस्ट प्रकारासाठी पैसे खर्चूनही स्वखर्चानेच कार्यालय गाठून पत्रे मिळवावी लागत असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. त्यात जाब विचारण्यासाठी जाणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बदलापूर शहरातील कुळगाव टपाल कार्यालय पूर्वेतील महात्मा गांधी चौकाजवळ अत्यंत दाटीवाटीच्या या वास्तूमध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात नव्या पोस्टमनची भर पडली आहे. या नव्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची पत्रे पोहोचवण्यात दिरंगाई केली जाते. त्यात अनेक ठिकाणी कर्मचारीच पोहोचत नसल्याने नागरिकांनाच टपाल कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यातही कर्तव्यात कसूर करूनही नागरिकांची फरफट असताना कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनाचा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
बदलापूर पश्चिमेत राहणाऱ्या ६५ वर्षीय मिनल सबनीस यांचे एक टपाल घेऊन कर्मचारी दारात आला. मात्र त्या पत्राची घरच्यांकडे शहानिशा करण्यापूर्वीच कर्मचारी दारातून निघून गेला. त्याला गाठताना त्या सर्वात आधी मांजर्ली कार्यालयात गेल्या. तेथे टपाल अधिकारी मंदार चौधरी यांनी त्यांना पूर्वेत दोन किलोमीटर असलेल्या कुळगाव टपाल कार्यालयात जाण्यास सांगितले.
त्यांच्याकडे तेथील कर्मचाऱ्यांचा संपर्क विचारला असता त्यांचा आमचा संबंध नाही असे उर्मट उत्तर दिले. कशाबशा कुळगाव टपाल कार्यालयात पोहोचलेल्या सबनीस यांना तेथील कर्मचाऱ्यांनी आता टपालाची गाठोडी बांधली आता नाही मिळणार असे उत्तर दिले. मात्र काही वेळात १०० रूपये घेऊन त्यांनी बांधलोली गाठोडी खुली करून पत्र दिले. विशेष म्हणजे टपाल न देता कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्याने योग्य व्यक्ती घरी नसल्याचा शेरा दफ्तरी नोंद केला.
मांजर्ली राहणाऱ्या शारदा नरेकर यांचे आधार कार्ड २० सप्टेंबरपासून कुळगाव कार्यालयात आल्याचे भारतीय टपाल खात्याच्या संकेतस्थळावर दर्शवत होते. मात्र चार दिवस उलटूनही ते येत नसल्याने त्यांनाही कार्यालयात जावे लागले. तेथेही आधार कार्डच्या पत्रावर घरी कुणी नसल्याचा शेरा लिहिल्याची धक्कादायक बाब समोर आली . स्पीडपोस्ट सेवेसाठी प्रति पत्र ५० रूपये खर्चूनही आम्हालाच कार्यालयात जाऊन पत्रे घेऊन यावी लागत असली तर त्या सेवेचा काय उपयोग असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांनाच करावा लागतो पाठलाग
आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा इतर महत्वाची पत्रे येण्याची वाट नागरिक पाहात असतात. ते पत्र कुठे पोहोचले हे संकेतस्थळावर दाखवले जाते. मात्र ते घरी येत नसल्याने नागरिकांच कार्यालयात गर्दी करावी लागते आहे. त्यासाठी वेळ आणि पैसेही खर्च करावे लागत आहेत. कुळगाव टपाल कार्यालय अत्यंत दाटीवाटीत असून नागरिकांना उभे राहण्यासाठीही जागा नाही. त्यामुळे ज्येष्ठांसह महिलांची कुचंबना होते.
सध्या नवे कर्मचारी रूजू झाले असून ते कामासाठी नवखे आहेत. त्यांना परिसर कळण्यासाठी वेळ लागत असल्याने पत्रे पोहोचण्यास उशिर होतो आहे. मात्र लवकरच पत्र वेळेत पोहोचतील. – दिपाली कांबळे, पोस्ट मास्तर, कुळगाव टपाल कार्यालय.