बदलापूरः उल्हास नदीत वाढलेली गढुळता आणि सातत्याने खंडीत होणारा वीज पुरवठा यामुळे पाणी उचल आणि शुद्धीकरण क्षमतेवर परिणाम झाल्याने बदलापूर शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात लागू करण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाण्यातील गढुळता कमी झाल्याने पाणी उचल आणि शुद्धीकरण क्षमता वाढली आहे. परिणामी लागू करण्यात आलेली पाणी कपात मागे घेण्यासाठी जीवन प्राधिकरणाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

यंदाच्या वर्षात मे महिन्यापासून पावसाला सुरूवात झाली होती. त्याच सोबत बदलापूर शहराच्या वेशीवरून जवाहरलाल नेहरू न्यास ते बडोदे द्रुतगती महामार्गाचे काम सुरू असल्याने या कामात झालेल्या खोदकामातील माती उल्हास नदीच्या पात्रात आणि त्यानंतर जलवाहिन्यांमध्ये शिरली होती. त्याचवेळी शहरातील कुचकामी महावितरण व्यवस्थेमुळे सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत होता. त्याचा पाणी उचल यंत्रणेला फटका बसत होता. परिणामी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी उचल आणि शुद्धीकरण क्षमता कमी झाली होती. त्याचा फटका पाणी वितरण यंत्रणेला बसत होता. अनेकदा पाणी उचल १२० दशलक्ष लीटरपेक्षा कमी होत असल्याने शहरातील काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा किंवा अपुरा पुरवठा होत होता. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस एका भागात पाणी कपात करून चक्राकार पद्धतीने पाणी कपात केल्यास पाण्याचे समप्रमाणात वितरण करता येणे शक्य होते. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणी कपात लागू केली होती.

मात्र शहरात या आठवड्यातील एक दिवस अशा चक्राकार पद्धतीने होणाऱ्या पाणी कपातीचा परिणाम पुढचे तीन ते चार दिवस होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण होते. अशावेळी आठवडाभर नागरिकांना पाणी टंचाई सहन करावी लागत होती. त्यामुळे नागरिकांत रोष निर्माण होत होता. सोमवारी शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली श्रीधर पाटील, संजय गायकवाड आणि इतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बदलापूर कार्यालयात धडक दिली. पाणी कपात बंद करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. त्यावर बोलताना उपविभागीय अधिकारी सुरेश खाद्री यांनी लवकरच याबाबतचा सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ऐन नवरात्रोत्सव तसेच दिवाळीपूर्वी पाणी कपातीतून मुक्तता मिळणार आहे.

पाण्याची गढुळता कमी झाली आहे. महावितरणाच्या वीज पुरवठ्याबाबतचा प्रश्नही काही अंशी कमी झाला आहे. त्यामुळे पाणी क्षमता १२० दशलक्ष लीटरवरून १३० लीटरवर पोहोचली आहे. यात सातत्य राहिल्यास लवकरच पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल. येत्या काही दिवसात हे शक्य होऊ शकते. – सुरेश खाद्री, उपविभागीय अभियंता.