शहापूर : मुंबईची तहान भागविणाऱ्या भातसा धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर सुरू असल्याने बुधवारी धरणाचे दोन दरवाजे ०.२५ सेमीने उघडण्यात आले. धरणातून सध्या १ हजार २७८.४० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून भातसा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
भातसा धरणाच्या सतत पाऊस पडत असून, बुधवारी सकाळपर्यंत ४२ मीमी पावसाची नोंद झाली होती. आतापर्यंत एकूण पावसाची नोंद १ हजार ६२१ मीमी झाली आहे. सध्या धरणाची पाणी पातळी १३८ मीटरवर पोहोचली आहे. भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भातसा नदी काठच्या परिसरातील गावांना, विशेषतः शहापूर–मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुलाच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाकडून नागरिकांनी नदीच्या काठावर जाऊ नये, पुलावर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. धरणाचे एक व पाच क्रमांकाचे दरवाजे ०.२५ सेमीने उघडण्यात आले असल्याचे भातसा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता रवी पवार यांनी सांगितले. या वेळी जलसंपदा विभागातील अधिकारी उपस्थित होते.