शहापूर : शहापूर तालुक्यातील बामणे येथील लिबर्टी ऑइल मिल कंपनीने दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा फायदा घेत भातसा नदीत सांडपाणी सोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे नदीच्या पाण्यावर तेलकट तवंग तयार झाला असून दूषित पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी चौकशी करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शहापूर तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

गेले दोन दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे शहापुर तालुक्यातील मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणाचे पाचही दरवाजे तब्बल चार मीटरने उघडण्यात आले होते. या भातसा नदी मधून मुंबई महानगराला पाणी पुरवठा होत असून तालुक्यातील गोठेघर, वाफे, शहापुर, आसनगाव, कळंभे, बोरशेती यांसह बहुतांशी ग्रामपंचायतींच्या पाणी योजनांद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. दुथडी भरून वाहणाऱ्या भातसा नदीमुळे नदी काठी असलेल्या पाणी योजनांचे पंपगृह पाण्याखाली गेले होते. पावसाने उसंत घेतल्याने आज सकाळी पंप गृहाची स्थिती पाहण्यासाठी गोठेघर – वाफे ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश कामडी आणि कर्मचारी गेले होते. त्यावेळी भातसा नदीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात तेलकट तवंग वाहत असल्याचे दिसून आले.

याबाबत कामडी यांनी चौकशी केली असता, भातसा नदीकाठी बामणे गावच्या हद्दीतील तेल, तुपाचे उत्पादन घेणाऱ्या लिबर्टी ऑइल मिल कंपनीने सांडपाणी भातसा नदीपात्रात सोडले असल्याचे त्यांना समजले. याबाबत सरपंच कामडी यांनी शहापुर तहसीलदारांचे लक्ष वेधले असून भातसा नदीच्या पाण्यावर आलेल्या तेलकट तवंगामुळे पाणी दूषित झाले असून असंख्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असून शेत जमिनीचे ही नुकसान होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसत असून या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.