ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वबळाचा नारा देत दबावतंत्र अवलंबणाऱ्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सोमवारी उद्यान उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून नाराजीनाट्य रंगले. पोखरण दोन येथील हिरानंदानी मेडोज भागातील प्राणवायू उद्यानात राजमाता जिजाऊ यांचा पुतळा उभारण्यावरून यापूर्वी राजकारण रंगले असतानाच, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जिजाऊंचे तैलचित्र मांडत या उद्यानाचे उद्घाटन उरकून घेतले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या रीतसर निमंत्रणानुसार उद्यानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडला.
ठाणे येथील पोखरण क्रमांक दोन भागातील हिरानंदानी मेडोज परिसरात पालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान आहे. या उद्यानात राजमाता जिजाऊ यांचा पुतळा होता. नूतनीकरण करताना तो काढण्यात आला. नूतनीकरणानंतरही पुतळा बसविण्यात आला नाही. तसेच या उद्यानाचे नाव बदलले जाणार असल्याची चर्चा होती. यातूनच मराठा मोर्चा आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी रमेश आंब्रे यांचे उद्यान विभागाचे अधिकारी केदार पाटील यांच्याशी वादही झाले होते. यानंतर भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्यासह आंब्रे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली होती.
या वेळी राजमाता जिजाऊ यांचेच नाव देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.राजमाता जिजाऊ प्राणवायू उद्यानाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याआधी रमेश आंब्रे यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जिजाऊंचे तैलचित्र ठेवत या उद्यानाचे उद्घाटन उरकून घेतले. राजमाता जिजाऊ यांचा पुतळा बसविण्यासाठी पैसे नसल्याचे आयुक्तांनी आम्हाला सांगितले होते. त्यामुळे आमदार निरंजन डावखरे यांनी स्वखर्चातून राजमाता जिजाऊ यांचे तैलचित्र घेतले. हे तैलचित्र उद्यानात बसवून प्रशासनाचा निषेध नोंदवून उद्यानाचे उद्घाटन केले, अशी प्रतिक्रिया आंब्रे यांनी दिली. भाजपकडून प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला असला तरी शिवसेनेकडून उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रम पत्रिकेतही गोंधळ
या कार्यक्रमासाठी पालिकेने निमंत्रण पत्रिका तयार केली होती. त्यात जिजाऊ यांच्या छायाचित्राऐवजी अहिल्यादेवी होळकर यांचे छायाचित्र वापरण्यात आले होते. यावरूनही भाजपचे पदाधिकारी रमेश आंब्रे यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाचा निषेध नोंदविला.
उद्यानाचे स्वरूप…
ठाणे शहरात प्राणवायूचे प्रमाण वाढावे आणि नागरिकांना मनोरंजन आणि विरंगुळ्याचे नवे ठिकाण उपलब्ध व्हावे या उद्देशातून ठाणे महापालिकेच्या उद्यान विभागाने हिरानंदानी मेडोज परिसरात ‘ऑक्सिजन पार्क’ची निर्मिती केली आहे. या उद्यानात विविध प्रजातींच्या एक हजार झाडांची लागवड, ७५ वर्षे जुन्या वड आणि पिंपळ झाडांचे जतन आणि शंभरहून अधिक औषधी वनस्पतीची उद्यानात लागवड करण्यात आली आहे. उद्यानात चालण्यासाठी मार्गिका, योग आणि व्यायाम करण्यासाठी व्यवस्था, बांबू पथ, छोट्या तलावाचे सौंंदर्यीकरण करण्यात आले.
