ठाणे : “जनतेनं विरोधकांना नाकारलं, आणि आता ते फक्त ‘रडीचा डाव’ रचत आहेत,” अशा शब्दांत भाजप नेत्या आणि आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राहुल गांधींवर आणि विरोधकांवर जोरदार प्रहार केला. लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर विरोधकांनी केलेले आरोप म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत आमचा विजय झाला तर सगळं ठीक, पण आम्ही हरलो की निवडणूक आयोगावर आरोप, हा विरोधकांचा ठरलेला रडीचा डाव आहे, असे त्या म्हणाल्या.

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर सोमवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. लोकसभा निवडणुकीत आमच्या अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या, पण आम्ही दुसऱ्याच दिवशी कामाला लागलो. आम्ही गावागावांत जाऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या. मात्र विरोधकांना सोयीचे राजकारण करण्याची सवय झाली आहे.

लोकांनी त्यांना नाकारलंय, हे ते मान्य करायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांचा हा रडीचा डाव आहे, असे त्या म्हणाल्या. आमचा विजय झाला तर सगळं ठीक, आणि आम्ही हरलो तर निवडणूक आयोगावर आरोप, हे योग्य नाही. लोकांनी दिलेला जनाधार मान्य करायला हवा. महाराष्ट्र आज प्रगतीच्या मार्गावर आहे. जनता समाधानी आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार कार्यक्षमतेने काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

“लावणी नवी नाही”

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात झालेल्या लावणी कार्यक्रमावर झालेल्या वादाबाबत चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली, सुप्रिया सुळे विसरल्या असतील, पण जुन्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात यापूर्वीही असे लावणी कार्यक्रम झाले आहेत. त्या वेळी शरद पवार हे स्वतः उपस्थित होते. मी त्या कार्यक्रमाची साक्षीदार आहे. त्यामुळे आता झालेला कार्यक्रम काही नवीन नाही. अनेक कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित होते, असे सांगत त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची पाठराखण केली.

जैन मुनी प्रकरणावर पक्षाची भूमिका स्पष्ट आहे.

जैन मुनी प्रकरणावर विचारले असता वाघ म्हणाल्या,“केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या विषयावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाने अधिकृत भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे मला या प्रकरणावर अधिक काही सांगायचं नाही.”

“पंकजा ताई धडाडीने काम करतायत”

प्रमोद महाजन हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वाघ म्हणाल्या, “पंकजा ताई आमच्या नेत्या आहेत. त्या धडाडीने आणि प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांच्या कुटुंबातील गोष्टींवर त्या स्वतःच उत्तर देतील. माझ्यासारख्या कार्यकर्त्याने त्या बाबतीत बोलणं योग्य नाही.”