डोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदारसंघात ज्या स्पर्धक उमेदवारांनी भाजपचे स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली. ते सर्व उमेदवार पराभूत झाले. परंतू, काही काळाने याच स्पर्धक, विरोधी पक्षातील उमेदवारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. डोंबिवलीत सन २०१४ ते सन २०२५ पर्यंत हा पक्षप्रवेशाचा इतिहास आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेत नगरसेवक, स्थायी समिती सभापती झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांचा डोंबिवलीतील एक उभरते नेतृत्व म्हणून प्रवास सुरू झाला. त्यानंतर भाजपने रवींद्र चव्हाण यांना सन २००९च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार म्हणून जाहीर केले. भाजपमध्ये स्थानिक जुने जाणते नेतृत्व असताना अचानक भाजप राज्य नेतृत्वाने रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातल्याने भाजपसह इतर पक्षांमधील नेत्यांच्या भुवया उंचावल्या.

सन २००९ पासून रवींद्र चव्हाण डोंबिवली शहराचे आमदार आहेत. या भागातील जनतेवर त्यांनी एक विशिष्ट गारूड केले आहे. त्यामुळे कोणी कितीही तगडी ताकद लावली तरी विधानसभा निवडणुकीत कोणी त्यांना आव्हान देऊ शकले नाही. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण हे कोकणी मालवणी असल्याने कोकणी विरूध्द आगरी समाज असा एक विषय निर्माण करून चव्हाण यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी विधानसभा निवडणुकीत आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत या वातावरणावर बोळा फिरविण्यात स्पर्धक यशस्वी झाले. रवींद्र चव्हाण पुन्हा डोंबिवली शहराचे आमदार झाले.

सन २००९ मध्ये डोंबिवली विधासनभा निवडणुकीत मनसेतर्फे राजेश कदम (आता शिंदे शिवसेनेत) यांनी रवींद्र चव्हाण यांच्या विरूध्द निवडणूक लढवली होती. कदम हेही कोकणातील आहेत. ही निवडणूक कोकणी उमेदवार विरूध्द कोकणी अशा सामाजिक स्तरावर झाली होती. या निवडणुकीत चव्हाण विजयी झाले होते. राजेश कदम यांनी नंतर शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. आता राजेश कदम शिंदे शिवसेनेत आता डोंबिवली उपजिल्हाप्रमुख आहेत.

सन २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रसेचे डोंबिवलीतील माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी चव्हाण यांच्या विरूध्द विधानसभेची निवडणूक लढवली होती. या काळात विकास म्हात्रे यांचा तारू जोरात होता. त्यामुळे या काळात त्यांनी निवडणूक काळात सावरकर रस्त्यावर चव्हाण यांच्या कार्यालयाबाहेर गोळीबार केल्याची घटना घडली होती. हेच विकास म्हात्रे नंतर भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले. भाजपमध्ये मातब्बर नगरसेवक असताना भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना स्थायी समिती सभापती हे मानाचे पद दिले. आता भाजपबरोबरचे त्यांचे गणित बिघडले आहे. भाजपमध्ये राहू की शिंदे शिवसेनेत जाऊ अशा डगरींवर ते आहेत. कोणत्याही क्षणी ते शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा आहे. भाजपमध्ये राहण्याची त्यांची इच्छा होती, पण आता भाजपच त्यांच्या कुडमुड्या राजकारणाला कंटाळले आहे. २०१९ मध्ये मनसेचे मंदार हळबे यांनी चव्हाण यांच्या विरुध्द निवडणूक लढवली. ते पराभूत झाले. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सन २०२४ च्या निवडणुकीत ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी तगडी लढत चव्हाण यांच्या विरुध्द दिली आणि आता तेही भाजपवासी झाले.