अध्यक्षपदी शिवसेनेच्या सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार बिनविरोध

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीत भाजपने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवार सुषमा लोणे यांची अध्यक्षपदी तर सुभाष पवार यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा परिषदेत सत्ता काबीज करण्यासाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ नव्हते तसेच शिवसेनेने भाजपला यापूर्वीच जिल्हा परिषदेतील सत्तेत सामील करून घेतले आहे. यामुळेच भाजपने निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १५ जुलै रोजी संपुष्टात आला असून यामुळे दोन्ही पदांसाठी बुधवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी ठाणे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.

जिल्हा परिषदेतील राष्टवादीच्या आठ तर काँग्रेसच्या एका सदस्याने यापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला असून यामुळे एकूण ५३ सदस्यांपैकी शिवसेनेकडे सर्वाधिक म्हणजेच ३५ सदस्य आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ता शिवसेनेकडेच राहील, हे स्पष्ट होते. तसेच अध्यक्ष पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे शिवसेनेतील इच्छूकांनी अध्यक्ष पदाची उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्यामध्ये कल्याणच्या सुषमा लोणे आणि अंबरनाथच्या पुष्पा बोराडे यांच्यात चुरश होती. अखेर शिवसेनेच्या नेत्यांनी सुषमा यांना उमेदवारी देऊ केली. या निवडणुकीच्या रिंगणात भाजपही उतरण्याची रणनीती आखत असल्याची चर्चा सुरू होती. तसेच भाजपकडून अध्यक्षपदासाठी रेश्मा मगर आणि उपाध्यक्ष पदासाठी कैलास जाधव हे अर्ज दाखल करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, बुधवारी निवडणुकीच्या दिवशी भाजपने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवार सुषमा लोणे यांची अध्यक्षपदी, तर सुभाष पवार यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

जिल्ह्य़ातील शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये निवडणुकीबाबत चर्चा झाली असून यानंतरच भाजपने निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

‘सर्वपक्षीय सत्तेचा पॅर्टन’

ठाणे जिल्हा परिषदेतील पाच विषय समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक गेल्यावर्षी झाली होती. त्यावेळेस सत्ताधारी शिवसेनेने भाजपलाही सत्तेत सामील करून महिला व बालकल्याण समिती देऊ केली होती. यातूनच भाजपने निवडणुकीतून माघार घेतल्याचे बोलले जात आहे. ठाणे जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा सर्वपक्षीय सत्तेचा पॅर्टन दिसून आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp neutral in thane zilla parishad elections zws
First published on: 16-07-2020 at 00:06 IST