ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपावरून तिढा निर्माण झाला असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभेच्या जागेची मागणी देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. कल्याण लोकसभेचा उमेदवार हा कमळ चिन्हावरच लढवावा अशी मागणी दिवा शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यासंदर्भाचे पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच भाजप आणि शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे खासदार आहेत. या मतदारसंघात दिवा शहराचा भाग येतो. दिवा शहरात शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विस्तव जात नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. सोमवारी दिवा शहराचे मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहीले आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात पक्षीय ताकद, लोकप्रतिनिधींचे संख्याबळ भाजप खासदारासाठी पोषक आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेचा उमेदवार हा कमळ चिन्हावरच लढवावा अशी दिवा शहरातील असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची एकमुखाने मागणी असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. या पत्रावर भाजपच्या दिवा शहरातील पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा >>>ठाणे : मोटारीला आग लागल्याने पूर्व द्रुतगती महामार्गावर कोंडी

यापूर्वी देखील भाजपच्या कल्याणमधील पदाधिकाऱ्यांनी कल्याण लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार असावा अशी मागणी केली जात होती. आमदार गणपत गायकवाड हे शिवसेने विरोधात उघड भूमिका घेत होते. गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरणी अटक झाल्यानंतर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी गणपत गायकवाड यांच्यासोबत असल्याचे चित्र निर्माण केले होते. त्यानंतर आता दिवा शहरातूनही शिवसेना ऐवजी भाजपने निवडणुक लढविण्याची मागणी केली घेतला जात असल्याने महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण-डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या लोकसभा मतदार संघात भाजपच्या लोकप्रतिनिधींचे संख्याबळ अधिक आहे. सध्याचे खासदार श्रीकांत शिंदे मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडून येत आहेत. युतीचा उमेदवार दिल्यास त्या उमेदवाराला कमळ चिन्हावरच लढवा अशी मागणी सर्वच पदाधिकाऱ्यांची आहे. – सचिन भोईर, अध्यक्ष, दिवा मंंडळ, भाजप.