कल्याण – कल्याण पूर्व खडेगोळवली परिसराला मागील काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. या भागाला पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी मंगळवारी भाजपच्या कल्याण जिल्हा शाखेतर्फे कल्याण डोंबिवली पालिकच्या कल्याण पूर्वेतील ड प्रभाग प्रभाग कार्यालयासमोर नागरिकांच्या उपस्थितीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यामुळे कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, काटेमानिवली आणि विठ्ठलवाडीकडे जाणारा मुख्य रस्त्यासह इतर पोहच रस्ते वाहतूक कोंडीने जाम झाले. राज्य, पालिकेतील सत्ताधारी असुनही भाजपला आंदोलन करावे लागत असल्याने शासन, प्रशासनावर कोणाचा वचक राहिला आहे की नाही, असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. प्रश्न कल्याण पूर्वेतील नागरिकांच्या पाण्याचा आहे, मग यासाठी इतर परिसरातील नागरिक, शालेय विद्यार्थी यांना वेठीस धरून उपयोग काय, असे प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपस्थित केले.

कल्याण पूर्व भागातील खडेगोळवली आणि परिसराला मागील काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. या तक्रारींची दखल घेऊन स्थानिक भाजप माजी नगरसेवकाच्या पुढाकाराने कल्याण जिल्हा भाजपतर्फे कल्याण पूर्वेतील ड प्रभाग कार्यालयासमोर पाण्याच्या मागणीसाठी भाजपतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात भाजप आमदार सुलभा गायकवाड सहभागी झाल्या होत्या. पाणी चोरांमुळे पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप आंदोलनकर्ते करत होते. कल्याण, डोंबिवलीतील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी या रस्ता रोको आंदोलन सहभागी झाले होते. पालिका निवडणुकांच्या तोंडावर जनतेसाठी काही करतो हेही या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न झाला.

साहाय्यक पोलीस आयुक्त, कोळसेवाडी पोलीस, पालिका शहर अभियंता अनिता परदेशी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत होते. पाणी पुरवठ्याचे ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय रस्ता रोको आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलनकर्ते करत होते. राज्यातील सत्ताधारी असुनही भाजपला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागते, हाच चर्चेचा विषय झाला होता. विद्यार्थी, शालेय बस या आंदोलनात अडकल्याने अनेक जागरूक पालकांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना या आंदोलनाची माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण पूर्वेतील काही नागरिकांनी सांगितले, की कोळसेवाडी पूर्व भागात काही जलकुंभ उंचावर आहेत. त्यामुळे परिसरात पुरेसे पाणी उपलब्ध होते. खडेगोळवली परिसराचा काही भाग उंचावर आहे. काही भाग जलकुंभापासून दूरवर आहे. त्यामुळे या भागात पाणी पोहचण्यात अडथळे येतात. या भागात कमी दाबाने, तर कधी पाणी पुरवठा होत नाही. अनेक नागरिकांनी या भागात जलवाहिन्यांना बुस्टर बसविले आहेत. त्याचा इतर भागाच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो.

तसेच, या भागात काही विकासकांचे गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. काही निर्माणाधिन आहेत. त्यांच्या घर नोंदणीवर कमी दाबाने होणाऱ्या पाण्याचा परिणाम होत आहे, अशीही चर्चा कल्याण पूर्वेतील नागरिकांमध्ये आहे. असे काही राजकीय विकासकही या आंदोलनात सहभागी झाल्याची चर्चा होती.