डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान ’ देशभर सुरू होत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती (२५ सप्टेंबर) ते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जयंती (२५ डिसेंबर) या काळात हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक भारतीयाला स्वदेशी संकल्पाशी जोडणे, लोकसहभागातून राष्ट्र निर्मितीला गती देणे आणि जागतिकीकरणाला सामान्यातल्या सामान्यांपर्यंत, घराघरात पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी येथे केले.

नमो रमो या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गरबा कार्यक्रमस्थळी “घर घर स्वदेशी” हा संदेश देणाऱ्या महाकाय आकाश फुग्याचे अनावरण यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान’ अंतर्गत भाजपतर्फे राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि मंडल पातळीवर कार्यशाळा, महिला व युवा संमेलन, व्यापारी व उद्योग परिषद, स्वदेशी मेळावे, तसेच ‘आत्मनिर्भर भारत संकल्प रथ’ यांसारखे विविध कार्यक्रम देशभर होणार आहेत. शेतकरी, महिला, युवक, कारागीर, छोटे दुकानदार, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक क्षेत्र, तसेच व्यापारी व उद्योग क्षेत्र या अभियानात सक्रिय सहभाग घेणार आहेत. ‘घर घर स्वदेशी’ या विचारातून स्वदेशी उत्पादनांचा प्रसार, लघु उद्योगांना प्रोत्साहन आणि स्थानिक उद्योजकांना आधार देणे हा अभियानाचा मुख्य उद्देश राहणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले.

या उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती मोहीम, स्पर्धा, परिसंवाद, स्वदेशी मेळावे तसेच समाज माध्यमांवर जनसंपर्क अभियान राबवले जाणार आहे. ‘मी फक्त स्वदेशी स्वीकारतो’ हा संकल्प लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, युवक व महिला यांच्याकडून करण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले. या निमित्ताने घरघर स्वदेशी, आत्मनिर्भर भारत आणि वोकल फाॅर लोकल या हॅशटॅग्सद्वारे या चळवळीला डिजिटल बळ दिले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशाची आर्थिक प्रगती, सांस्कृतिक ओळख आणि सामाजिक आत्मनिर्भरता अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला, असे चव्हाण यांनी सांगितले.

डोंबिवलीतील नमो रमो नवरात्रीच्या निमित्ताने गेली ८ वर्षे स्थानिक कारागीर, उत्पादक, महिला बचतगट आणि व्यावसायिकांना अगोदरपासूनच पाठबळ देत असल्याचे चव्हाण यांनी आवर्जून सांगितले.

या कार्यक्रमाला भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस शशिकांत कांबळे, मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, करण जाधव, धनाजी पाटील, प्रिया जोशी, शक्तिवान भोईर, रितेश फडके, पवन पाटील, लक्ष्मण पंत, परेश तेलंगे, विश्वजीत करंजुले, नितेश म्हात्रे, स्वप्निल काटे, समीर भंडारे, नवनाथ पाटील, माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर, राजश्री पाजनकर हे पदाधिकारी आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.