लोकप्रतिनिधींसह शेकडो कार्यकर्त्यांकडून नियमभंग

स्वातंत्र्य दिनाच्या पाश्र्वभूमीवर भाजपच्या वतीने ठाणे जिल्ह्य़ात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या देशभक्ती तिरंगा यात्रेत खासदार कपिल पाटील आणि आमदार नरेंद्र पवार यांनी विनाहेल्मेट प्रवास करून सरकारी नियमांना हरताळ फासला. सत्ताधारी पक्षात असणाऱ्या आणि लोकांचे नेतृत्व करणाऱ्या या मंडळींनी दिवसाढवळ्या वाहतुकीचे नियम मोडल्याची चर्चा जिल्ह्य़ात रंगली होती.

राज्यात हेल्मेटसक्ती कायम करण्यासाठी राज्य शासनाने ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ असे कडक धोरण अवलंबले आहे. हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना इंधनपुरवठा न करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून दिल्या जात असताना राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेले भाजपचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींकडूनच या धोरणाला हरताळ फासण्याचा प्रकार ठाण्यात उघड झाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या भागांमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आल्या होत्या. त्यामध्ये शहापूर ते कसारा या दरम्यान बुधवारी मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. भिवंडीचे खासदार कपिल पाटील आणि कल्याणचे आमदार नरेंद्र पवार या रॅलीला उपस्थित होते. या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकल आणि सोबत हेल्मेट घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या खासदार आणि आमदार महाशयांनी मोटरसायकल आणली असली तरी हेल्मेट मात्र आणले नव्हते. हेल्मेट परिधान न करताच या मंडळींनी संपूर्ण यात्रा पूर्ण केली. त्यांच्यावर या प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे त्यांच्यासह असलेल्या कार्यकर्त्यांनीही हेल्मेट उतरवून ही रॅली पूर्ण केली.

ठाण्यातही नियमभंग

शहापूरमध्ये खासदार आणि आमदारांनी नियमभंग केल्याचे दिसून येत असताना दुसरीकडे ठाण्यातही आयोजित यात्रेमध्ये शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी हेल्मेट घातले नव्हते. तिरंगा झेंडय़ासह उपस्थित या मंडळींनी वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत ठाण्यातील मुख्य रस्त्यांवरून ही रॅली काढली. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली नाही.