ठाणे : ठाणे शहरातील बेकायदा बांधकामांसह विविध नागरी समस्यांसाठी शिवसेना (ठाकरे गट), मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस पक्षाने सोमवारी पालिकेवर मोर्चा काढून आयुक्त सौरभ राव यांना घेराव घातला होता. त्यापाठोपाठ दुसऱ्या दिवशी म्हणजेच, मंगळवारी नौपाड्यातील भाजपच्या माजी नगरसेवकांनी आयुक्त राव यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत बेकायदा बांधकामांवर कारवाईचा आग्रह धरला.

अखेर आयुक्त राव यांनी आश्वासन दिल्यानंतर माजी नगरसेवकांनी आंदोलन मागे घेतले. नौपाडा भागातील भाजपच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, माजी नगरसेवक सुनेश जोशी यांच्यासह कार्यकर्त्यांनी मंगळवारी हे आंदोलन केले. ठाणे महापालिका मुख्यालयातील आयुक्त सौरभ राव यांच्या कार्यालयाबाहेरच हे कार्यकर्ते ठिय्या मांडून बसले होते. हे सर्वजण आयुक्तांना भेटून निवदेन देणार होते, अशी चर्चा होती. परंतु अचानकपणे आयुक्त कार्यालयात येताच या सर्वांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला.

या प्रकारामुळे सुरक्षारक्षकांचीही धावपळ झाली. बेकायदा बांधकामांवर वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. नौपाड्यातील प्रभाग क्र २१ मधील भक्ती मंदिर येथील रेनबो स्कूल, भास्कर कॉलनी येथील अनमोल सफायर, घंटाळी येथील शिवकृपा इमारतीवर तात्काळ कारवाई व्हावी. राम मारुती रोड, गोखले रोड वरील फेरीवाल्यांवर कारवाई करावी आणि रस्त्याचा वापर नागरिकांना चालण्यासाठी होईल असे बघावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच एस के जी मोरेश्वर रिऍलिटीज या विकासकाने नगरसेवक निधीतून बांधण्यात आलेला ज्येष्ठ नागरिक कट्टा महापलिकेची कुठलीही परवानगी न घेता तोडल्यामुळे त्यांच्यावर महापालिकेनी गुन्हा दाखल करावा.

नौपाडा प्रभाग समिती गावदेवी येथे ज्येष्ठ नागरिक कट्टा पण संबंधित लाभार्थ्याने कुठलीही परवानगी न घेता काढला आहे. त्यामुळे त्या लाभार्थ्यावर ही गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. अखेर आयुक्त राव यांनी आश्वासन दिल्यानंतर माजी नगरसेवकांनी आंदोलन मागे घेतले. दिवाळीनंतर या संदर्भात कारवाई करण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे सुनेश जोशी यांनी सांगितले.