उल्हासनगर: हरियाणा आणि दिल्लीतून अवैधरित्या आणलेल्या उच्च प्रतीच्या स्कॉच मद्याचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन वेगवेगळ्या छाप्यात जप्त केला आहे. यात तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ३५२ सीलबंद बाटल्यांसह दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १८ लाखांपेक्षा अधिक आहे.
उल्हासनगर शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला अवैध मद्य साठा आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उल्हासनगर कॅम्प एक येथील डायमंड हॉलीडेज येथील दुकान क्रमांक ४७ येथे बुधवारी धाड टाकली. या धाडीत अरुणकुमार रामचंद्र पोपटानी याच्याकडे परराज्यातून विनापरवाना आणलेला स्कॉच या मद्याचा साठा आढळून आला. पथकाकडून पोपटानी यांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोपटानी यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी असाच मद्यसाठा आणखी एका ठिकाणी असल्याची माहिती दिली. या माहितीवरून राज्य
उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुसरी धाड उल्हासनगरातील मधुबन चौकाजवळील मनवानी मॅन्शनच्या पंपहाऊसवर टाकली.या ठिकाणी सुरज श्रीकौशल शुक्ला यांच्याकडेही उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला स्कॉच मद्याचा साठा सापडला. त्यानंतर अंबरनाथमधील आणे गावातील अक्षय लॉजजवळील एका पक्क्या घरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिसरी धाड टाकली. या ठिकाणी दीपक राजकुमार नंनकानी याच्याकडेही अवैध स्कॉच साठा आढळून आला.
या तिन्ही ठिकाणांहून जप्त केलेल्या ३५२ बाटल्यांमध्ये नामांकित कंपनीच्या स्कॉच मद्याचा समावेश आहे. या कारवाईत जप्त केलेल्या मुद्देमालात दोन वाहनांचाही समावेश आहे. हा सर्व नामांकित दारूचा साठा दिल्ली आणि हरयाणातून बेकायदेशीररित्या उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे आणण्यात आला होता. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अरुणकुमार पोपटानी, सुरज शुक्ला आणि दीपक नंनकानी या तिघांना अटक केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई निरीक्षक दिपक परब यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे.