ठाणे : ठाण्यात मंगळवारी रात्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूका सुरु असताना वागळे इस्टेट भागात एक भयंकर हत्याकांड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भर रस्त्यात एका तरुणाला धडक देऊन त्याच्या डोक्यावरून दोन ते तीन वेळा कार नेऊन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात संतोष पवार, महेश पवार, अमित पवार आणि महेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
हा प्रकार इतका विचित्र होता की, मृत व्यक्तीच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. भर रस्त्यात हा प्रकार झाल्याने ठाण्यात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, हत्याकांडातील आरोपी संतोष हा तडीपार होता. असे असतानाही ही घटना झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
विठ्ठल गायकर असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचे मित्र शंकर वरठे हे जखमी झाले आहेत. शंकर वरठे आणि आरोपी संतोष पवार यांच्यामध्ये जागेच्या कारणावरून वाद होते. संतोष विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली होती. परंतु त्याला ठाणे पोलिसांनी तडीपार घोषित केले होते असे असतानाही तो राहत्या ठिकाणी वारंवार येत असे. मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास शंकर वरठे, त्यांचा मामे भाऊ बाबु बरफ त्यांचे मित्र वसंत टोकरे, विठ्ठल गायकर हे वागळे इस्टेट येथील रस्ता क्रमांक २७ परिसरात गणेशमूर्ती, मिरवणूका पाहत होते.
विठ्ठल, बाबु आणि शंकर हे परिसरात सिगारेट घेण्यासाठी गेले असताना संतोष पवार हा वसंत यांना मारहाण करु लागला. त्यामुळे वाद सोडविण्यासाठी शंकर आणि बाबु गेले. त्यावेळी संतोष याचा भाऊ महेश पवार, मित्र महेश आणि अमित हे देखील वाहनाने तेथे आले होते. त्यांनी बाबु यांना मारहाण केली. तर वसंत टोकरे हे वाद झाल्याने तेथून निघून गेला. दरम्यान, बाबु हे श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता, संतोष आणि महेश हे कारमध्ये बसले. त्यांना शंकर समजावित असतानाच संतोष याने कार सुरु करून त्याच्या कारने समोर उभे असलेल्या विठ्ठल यांना जोरदार धडक दिली.
त्यामुळे विठ्ठल हे खाली पडले. त्यानंतर संतोष याने त्याला दोन ते तीन वेळा चिरडले. त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेदा झाला होता. त्यानंतर संतोष याने शंकर यांना देखील कारने धडक दिली. या घटनेनंतर विठ्ठल यांचा मृतदेह भर रस्त्यात तसाच पडून होता. घटनेप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरु आहे. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याचे कळते आहे. तर गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. याप्रकरणानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला होता.