ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरात ६ हजारांहून अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी राज्य शासनाकडे पाठविला आहे. १ हजार ९९७ ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात येणार आहे. शहरातील सिग्नल परिसर, मुख्य चौक, शाळा, महाविद्यालय तसेच निर्जन ठिकाणी हे कॅमेरे बसविले जाणार आहे. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच गुन्हेगारीला पायबंद घालणे शक्य होणार आहे. या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले.
ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतात. या शहरांमध्ये एकूण ३५ पोलीस ठाणे आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरात पोलिसांची पथके, गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी गस्ती घालत असतात. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. शहरात सोनसाखळी चोरी तसेच इतर गुन्हे घडत असतात. ठाणे महापालिकेने शहरात १७५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असले तरी भौगोलिक रचनेच्या तुलनेत शहरात कॅमेऱ्यांची संख्या पुरेशी नाही.
हेही वाचा – कल्याणमध्ये महिलेच्या हत्येतील आरोपीला अटक
कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरात स्मार्टसिटी अंतर्गत एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. ठाणे आणि कल्याण वगळता इतर शहरात शासकीय योजनेतून सीसीटिव्ही कॅमेरे बसविलेले नाहीत. त्यामुळे याठिकाणी गुन्हेगारीला पायबंद घालताना पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत असून त्याचबरोबर एखाद्या गुन्ह्याची उकल करतानाही अडचणीत येत आहेत. त्यामुळे कल्याण वगळता ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात साडेपाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय पोलिसांनी घेऊन तसा प्रस्ताव सुरुवातीला तयार केला होता. परंतु त्यात पुन्हा बदल करत ६ हजार ५१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव पोलिसांनी तयार करून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.
एकूण १ हजार ९९७ ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे प्रामुख्याने शहरातील मुख्य चौक, सिग्नल, निर्जन ठिकाणी बसविले जाणार आहेत. या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती ठाणे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
हेही वाचा – खाडी किनारी कचऱ्याचा भराव; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वाहने फोडली
कॅमेऱ्यांचे वैशिष्ट्य
यामध्ये स्थिर कॅमेरे, ३६० डिग्रीमध्ये फिरणारे कॅमेरे, लांबून तसेच अंधारात वाहनांचे क्रमांक स्पष्ट दिसतील असे एएचपीआर कॅमेरे तर, वाहनांच्या वेगाची नोंद करणारे आरएलव्हीडी कॅमेरे. अशा प्रकारचे अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात येणार असून ते ठाणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी नियंत्रण कक्षात बसून संपूर्ण शहरातील गुन्हेगारीवर तसेच वाहतूक कोंडीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
कोणत्या भागात किती कॅमेरे
शहरे ठिकाणे – सीसीटीव्हींची संख्या
ठाणे ते दिवा – ९१७- ३१६३
भिवंडी- ५५५- १,३४७
उल्हासनगर ते बदलापूर – ५२५- १,५४१
एकूण – १९९७- ६०५१