ठाणे : मुंबई नाशिक महामार्गालगत भिवंडी खाडी किनारी कचऱ्याचा भराव टाकल्याने घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांच्या काचा फोडत वाहनाच्या चाकांची हवा काढली. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील कचऱ्याच्या प्रश्नावर प्रशासनावर टिका केली आहे.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये महिलेच्या हत्येतील आरोपीला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाण्यातील संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट भिवंडीच्या खाडीकिनारी करण्यात येते. त्यामुळे शहरभर दुर्गंधी पसरली आहे. ही अनधिकृत भरणी खासगी मालकाच्या जागेवर केली जाते आहे. अशी भरणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही. या कचऱ्याच्या भरणीमुळे हवा प्रदूषित होत आहे. खाडीचे पाणी प्रदूषित होत आहे. हिवाळ्यात परदेशातून येणारे स्थलांतरी पक्षी येईनासे झाले आहेत. असे आव्हाड यांनी समाजमाध्यमावर म्हटले आहे. तसेच येथील चित्रीकरण देखील प्रसारित केले. एवढे होऊनसुद्धा ठाणे महानगरपालिका प्रशासन ऐकायला तयार नाही. सोमवारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कचरा वाहून नेणाऱ्या वाहनाची हवा काढली. आम्ही आंदोलन करीतच राहू, पण, ठाणेकर जनतेनेसुद्धा रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवावी. ४० वर्ष होऊनही जर ठाणे महापालिकेला स्वतंत्र कचराभूमी बनवता येत नसेल तर ठाणेकरांनी या लोकांना निवडून देणे म्हणजे आत्मघातच नाही का? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.