डोंबिवली: सार्वजनिक जागेत मद्य विक्रीचा कोणताही परवाना नसताना ग्राहकांना दीपक बीअर शाॅपी दुकानासमोरील मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली म्हणून मानपाडा पोलिसांनी बीअर शाॅपीचे मालक अनिकेत गुडेकर यांच्या विरुध्द महाराष्ट्र प्रतिबंधित कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवली जवळील गोळवली येथे व्यंकटेश पेट्रोल पंपाच्या समोरील जागेत दीपक बीअर शाॅपी दुकानाचा मालक आपल्या दुकानासमोरील मोकळ्या जागेत मंच ठेऊन ग्राहकांना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देत आहे, अशी माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीची पोलिसांनी खात्री केल्यावर असा प्रकार त्या दुकानासमोर सुरू असल्याचे पोलिसांना समजले.
साहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दीपक बीअर शाॅपी दुकानाच्या जागेत धाड टाकली. त्यावेळी तेथे मंचकांवर सात ते आठ ग्राहक मोकळ्या जागेत दारू पित होते. त्यांच्या समोर दारू बरोबर खाण्याच्या वस्तू होत्या. साहाय्यक पोलीस निरीक्षक फडोळ यांनी दीपक बीअर शाॅपीच्या गल्ल्यावर बसलेल्या इसमाला अशाप्रकारे मोकळ्या जागेत दारू विक्रीचा परवाना आहे का आपल्याकडे, अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी अशाप्रकारचा परवाना नसल्याची माहिती पोलिसांंना दिली. सदर जागा आपल्या मालकीची असल्याचे गल्ल्यावर बसलेल्या इसमाने पोलिसांना सांगितले. सदर इसमाने आपले नाव अनिकेत गणेश गुडेकर असल्याचे सांगितले.
दारू विक्रीचा परवाना जवळ नसताना सार्वजनिक ठिकाणी ग्राहकांना बेकायोशीररित्या दारू पिण्यास देऊन महाराष्ट्र प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले म्हणून मानपाडा पोलिसांनी अनिकेत गुडेकर यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
दारू अड्डे छापे
शिळफाटा रस्त्यावरील पिसवली गाव हद्दीत संतोषी माता चाळ भागात सचिन विक्रम वाघमारे (५५) यांच्या दारू अड्ड्यावर मानपाडा पोलिसांनी छापा मारून हातभट्टीची ९० लीटर गावठी दारू जप्त केली आहे. ही दारू सुमारे सहा हजार रूपये किमतीची होती. बेकायदेशीररित्या दारूचा साठा केल्याबद्दल आणि सार्वजनिक ठिकाणी विक्रीसाठी ठेवली म्हणून पोलिसांनी त्यांच्या विरुध्द दारू प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.
पिसवली गाव हद्दीत सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्या अभिमन्यू मल्ल (३३) आणि धर्मेंद्रकुमार राम यांच्या विरुध्द अंमली पदार्थ विरोधी कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.शिळफाटा रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात गावठी दारू, अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याने पोलिसांनी या भागात छापा सत्र सुरू केले आहे.