scorecardresearch

डोंबिवलीत दहशत माजविणाऱ्या फेरीवाल्यांवर गुन्हे

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील उर्सेकरवाडीमध्ये एका रुग्णवाहिका चालकाला बेदम मारहाण करून त्याला गंभीर जखमी करणाऱ्या दोन फेरीवाल्यांविरुद्ध रामनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

hawkers Dombivli,
डोंबिवलीतील उर्सेकरवाडी परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला आहे (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

डोंबिवली – येथील पूर्व रेल्वे स्थानक भागातील उर्सेकरवाडीमध्ये एका रुग्णवाहिका चालकाला बेदम मारहाण करून त्याला गंभीर जखमी करणाऱ्या दोन फेरीवाल्यांविरुद्ध रामनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पालिका कर्मचाऱ्यांनी फेरीवाल्यांवर कारवाई केली. नागरिकांनी फेरीवाल्यांना बाजुला बसण्यास सांगितले की फेरीवाले संघटितपणे कर्मचारी किंवा नागरिकाला घेरून त्याच्याशी उद्धट वर्तन करतात. अलीकडे हा प्रकार वाढला आहे.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात अनेक वर्षांपासून परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी आहे. याच प्रकारातून गुरुवारी रात्री अशोक रामजी गुप्ता (३१, रा. मोतिराम केणे चाळ, आयरे रोड पोलीस चौकीसमोर, डोंबिवली पूर्व), रोहित अशोक गुप्ता (२३, रा. लक्ष्मण केणे इमारत, दत्तनगर, डोंबिवली पूर्व) या दोन फेरीवाल्यांविरुद्ध रुग्णवाहिका चालक गणेश माळी यांना मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या दोघांचा तपास घेऊन त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे.

हेही वाचा – कल्याणमध्ये दहशत पसरविणाऱ्या गुंडाची नाशिक तुरुंगात रवानगी

पूर्व भागातील इंदिरा चौक, कामत मेडिकल पदपथ, उर्सेकरवाडी, मधुबन सिनेमा गल्ली ही आपल्या मालकीची आहे, अशा अविर्भावात ठराविक फेरीवाले या भागात दहशतीचा अवलंब करून व्यवसाय करतात. त्यांची ही दादागिरी ग प्रभागाचे पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे यांनी काही महिन्यांपासून मोडून काढली आहे. या भागात उघडपणे नाहीच, पण चोरून लपून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचे सामान ग प्रभागाच्या पथकाकडून तात्काळ जप्त केले जाते. त्यामुळे फेरीवाले संतप्त आहेत. कारवाई करताना अनेक वेळा फेरीवाले कारवाईत अडथळा आणतात. परंतु, कारवाई पथक त्यांच्या दहशतीला जुमानत नाही.

पोलिसांनी सांगितले, गुरुवारी रात्री रुग्णवाहिका चालक गणेश माळी (३०, रा. भोपर) उर्सेकरवाडीतील एक रुग्ण नोबल रुग्णालयातून घेण्यासाठी आला होता. रुग्णवाहिका रुग्णालयाच्या प्रवेशव्दाराजवळ लावत असताना रुग्णवाहिकेचे मागचे चाक पदपथाच्या एका कोपऱ्याला लागून तेथे लावण्यात आलेला कडाप्पा खाली पडला. नजरचुकीने ही घटना घडली होती. तरी आरोपी फेरीवाले अशोक गुप्ता, रोहित गुप्ता यांनी चालक माळी याला ‘तू कडाप्पा का पाडलास’ असा प्रश्न करून अशोक, रोहितने गणेशला शिवीगाळ करत ठोशाबुक्क्याने बेदम मारहाण केली. तसेच बांबूचे फटके गणेशच्या हातावर मारून त्याला जखमी केले. या झटापटीत गणेशच्या गळ्यातील सोन्याची साखळी तुटून रस्त्यावर पडून गहाळ झाली आहे. ज्या फेरीवाल्यांवर मागील अनेक वर्षांत गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर स्थानबद्ध किंवा तडीपाराची कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

हेही वाचा – ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या मंगळवारी जाहीर होणार

डोंबिवली पूर्वेत एका माजी नगरसेवकाचे फेरीवाला शुल्क वसुलीचे कंत्राट आहे. ते वसुली लक्ष्य पूर्ण करण्यात फेरीवाले महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे पूर्व भागातून फेरीवाले हटणार नाहीत याची काळजी हा माजी नगरसेवक घेतो. या नगरसेवकाला त्याच्या नेत्याचा सक्रिय पाठिंबा असल्याचे कळते. एक बेकायदा सभागृह उभारणी प्रकरणात हा लोकप्रतिनिधी अडचणीत आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 14:47 IST
ताज्या बातम्या