ठाणे : भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह ३६ जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पालकांचा सामावेश आहे. हल्ला करणे तसेच अटकाव केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे. तर तक्रारदार याच्यावरही विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देतो असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार याने दिलेल्या तक्रारीनुसार, ते डाॅक्टर असून त्यांची आणि त्यांच्या भागीदाराची ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एक संस्था आहे. सोमवारी या संस्थेमध्ये संजय वाघुले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह तक्रारदार यांना डांबून ठेवल्याचा आरोप आहे. नौपाडा पोलीस त्यांना घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी त्यांनी तक्रार दिल्यानंतर संजय वाघुले यांच्यासह ३६ जणांवर गुन्हा दाखल आहे. यामध्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक आणि विद्यार्थ्यांचाही सामावेश आहे. तर संबंधित डाॅक्टर विरोधातही फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. एका विद्यार्थीनीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संस्थेच्या माध्यमातून नोकरी मिळवून देतो असे सांगून डाॅक्टरसह त्याच्या साथिदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय वाघुले यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.