लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: मुंबईसह संपुर्ण राज्यभरात विकासाची, आरोग्याची, स्वच्छता आणि रस्ते काँक्रीटीकरणाची कामे होत आहेत. पंरतु, त्याची काहीजणांना पोटदुखी होत असल्याची टीका करत अशा लोकांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे जाऊन मोफत उपचार घ्यावेत, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.

ठाणे जिल्हा मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा शनिवारी, अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी केंद्रीय पंचायत राजमंत्री कपील पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित होते. या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना टोले लगावले. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी साखरविषयात डॉक्टरेट मिळविली आहे. त्यामुळे त्यांनी काही लोकांची साखरही वाढली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. ठाणे जिल्हा रुग्णालयातील ४० डॉक्टरांना करोना झाला होता. त्यावेळी पीपी किट घालून त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला होता, अशा आठवणींना उजाळा देत त्या काळात जिल्हा रुग्णालयाने केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. सुपरस्पेशलिटी रुग्णालय इमारत उभारणीचे काम आता सुरु झाले असले तरी रुग्णालयात मिळणाऱ्या सुपरस्पेशलिटी सुविधांचा अनुभव ठाणेकरांनी घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा- “ज्याला बाप सांभाळता येत नाही, तो…”, शिंदे गटाच्या आमदाराची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे आणि ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे वेगळे नाते होते. या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना दिघे हे कशाप्रकारे मदत करायचे, अशा जुन्या आठवणीही त्यांनी यावेळी सांगितल्या. या रुग्णालयाच्या जागेवर आता सुपरस्पेशलिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. तसेच ठाण्यात कर्करोग रुग्णालयाची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे यापुढे जिल्ह्यातील एकाही रुग्णाला मुंबईत जावे लागणार नाही. या प्रवासादरम्यान होणारे रुग्ण मृत्युचे प्रमाण कमी होईल, असेही ते म्हणाले. या रुग्णालयाचे काम १५ महिन्यात पूर्ण केल्यास बोनस दिला जाईल, असे त्यांनी जाहिर केले. तसेच रुग्णालय उभारणीच्या कामात कोणतेही अडथळे येता कामा नये, अशी तंबी त्यांनी सर्व विभागांना यावेळी दिली.

एखादे रुग्णालय उभारणीसाठी ४ ते ७ वर्षांचा कालावधी लागत होता. तशी व्यवस्था आपल्याकडे होती. या व्यवस्थेत बदल करून वाराणसीच्या धर्तीवर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय इमारत १८ महिन्यात पुर्ण केली जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. रुग्णालय इमारतीच्या कामाचा सातत्याने स्वत: आढावा घेणार आहे. इमारतीचे काम पुर्ण होताच पुढील सहा ते आठ महिन्यात तिथे आरोग्य साहित्य आणि यंत्रणा उभारून रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. रुग्णालय इमारत उभारणीचे काम होईपर्यंत त्याठिकाणी आवश्यक असलेली यंत्रणा, डॉक्टर अशी व्यवस्था तयार ठेवावी. जेणेकरून रुग्णालय सुरु करण्यास विलंब होणार नाही, अशी सुचना केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी केली. एकीकडे टोकाचा विकास होत असताना दुसरीकडे ग्रामीण भाग अविकसित आहे. याठिकाणी रुग्णालय आणि आरोग्य केंद्र असून त्याठिकाणीही सोयीसुविधा पुरविणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.