ठाणे :- शिवसेनाप्रणित शेतकरी सेनेच्या वतीने राज्यभरात सुरू होणाऱ्या शेतकरी संवाद यात्रेचा शुभारंभ टेम्भी नाका येथे करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीफळ वाढवून या संवाद यात्रेला भगवा झेंडा दाखवला.

या यात्रेचा माध्यमातून शिवसेना शेतकरी सेनेचे पदाधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. त्यातील काही प्रश्नांचे जागच्या जागी निराकरण करण्यात येईल.  तसेच गरज पडल्यास मुख्यमंत्री स्वतः ऑनलाइन त्या शेतकऱ्याशी थेट संवाद साधून त्याचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहेत.

हेही वाचा >>> ठाणे महापालिकेचा पर्यावरणपुरक विसर्जनाचा देखावा; राष्ट्रीय हरीत लवादाने पालिकेचे पिळले कान

आजपासून ही सुरु यात्रा सुरू होणार असून राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहे. यावेळी प्रामुख्याने त्यांना भेडसावणारे प्रश्न समजून घेणे, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची त्याना थेट माहिती देणे, त्याना त्या योजनांचे लाभ मिळवून देणे तसेच तसेच वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून फायद्याची शेती करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांशी त्यांचा थेट संवाद साधून त्याना नाविन्यपूर्ण शेतीबाबत अवगत केले जाणार आहे.

हेही वाचा >>> ठाणे, कल्याणमध्ये मुसळधार पाऊस; नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या यात्रेच्या माध्यमातून शेतकरी आणि शासन यांच्यात थेट संवाद साधणे शक्य होणार असून मुख्यमंत्री स्वतः या यात्रेकडे प्राथमिकता देऊन त्याकडे लक्ष देणार आहेत. एकीकडे राज्यात यंदा कमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न आतापासूनच आ वासून उभे आहेत. अशात शासनाचे शेतकरी बांधवांकडे लक्ष असून त्यांचे प्रश्न जाणून ते सोडवण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचा संदेश या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्याचा शिवसेनेचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आज झालेल्या या शुभारंभ प्रसंगी शेतकरी सेनेचे अध्यक्ष धनंजय जाधव, नाथराव कराड, समन्वयक योगेश्वर रायते तसेच राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले प्रगतिशील शेतकरी आणि शेतकरी सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.