ठाणे – डिजिटल युगात हातात पुस्तक घेऊ वाचन करणे, त्यातून मिळणारा आनंद अनुभवणे या गोष्टींचा विसर अनेकांना पडत आहे. यासाठी वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अनेक संस्था वाचनालये विविध उपक्रम राबवत आहेत. याच पार्श्वभूमीवर साहित्य यात्रा या संस्थेच्यावतीने ठाण्यात भव्य पुस्तक प्रदर्शन भरविले आहे. या प्रदर्शनात सर्वाधिक खरेदी लहान मुलांकडून होत असल्याची माहिती संस्थेच्यावतीने देण्यात आली. केवळ बालसाहित्याची विक्री तब्बल एक लाख रुपयांहून अधिक झाली आहे.

साहित्य यात्रा या संस्थेच्यावतीने २६ सप्टेंबरपासून ते १९ ऑक्टोबर या कालावधीत भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्ययात्रा ही संस्था गेले दहा वर्षांपासून नियमितपणे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करत आहे. हे पुस्तक प्रदर्शन ठाण्यातील कामथे मैदान, घंटाळी चौक, विष्णुनगर येथे भरविण्यात आले आहे. दिवाळी तसेच उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत साहित्ययात्रा या संस्थेच्या माध्यमातून ठाण्यात अनेक ठिकाणी पुस्तक प्रदर्शन भरविण्यात येते. या प्रदर्शनात बालसाहित्य, कादंबरी, कथासंग्रह, धार्मिक ग्रंथ आणि विविध इंग्रजी भाषेतील विविध पुस्तकांचा समावेश आहे. या ग्रंथ प्रदर्शनाला ठाण्यासह डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत तसेच नवी मुंबईतील वाचकप्रेमी देखील भेट देऊन पुस्तक खरेदीचा आनंद लुटत आहेत. पालक आणि आजी – आजोबा लहान मुलांना घेऊन प्रदर्शनाला येत आहेत. एक वर्षापासूनच्या मुलांसाठीही पुस्तके उपलब्ध असल्यामुळे लहानग्यांना पुस्तकांची ओळख करून देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे. अनेक मुले पुस्तकांवरील चित्रांकडे आकर्षित होऊन स्वत:च खरेदीसाठी आग्रह धरत आहेत.

अशा आहेत सवलती

पुस्तक प्रदर्शनात मेहता पब्लिशिंग हाऊसची पुस्तके ३५ टक्के सवलतीत १२ ऑक्टोबरपर्यंत विक्री करण्यात आली. तसेच प्रदर्शनात ५० टक्के सवलतीत काही पुस्तकांचा वेगळा विभाग आहे. रोहन प्रकाशनाची निवडक ५० पुस्तक २५, ३०टक्के सवलतीत आहेत.

५० प्रकाशकांची पुस्तके एकाच छताखाली

साहित्य यात्रेच्या भव्य पुस्तक प्रदर्शनात पन्नास प्रकाशकांच्या पुस्तकांचा समावेश आहे. त्यात मौज प्रकाशन, राजहंस प्रकाशन, ज्योत्स्ना प्रकाशन, मधुश्री, डायमंड, परम मित्र, मॅजेस्टिक प्रकाशन, श्री विद्या प्रकाशन, साकेत प्रकाशन प्रकाशकांची पु्स्तके आहेत. तसेच बालसाहित्य मराठीतील आणि इंग्रजी भाषेतील आहेत. धार्मिक पुस्तक तसेच विविध विषयांवर पुस्तकेही आहेत.

या प्रदर्शनात पालक आपल्या मुलांना घेऊन येत आहेत. त्यामुळे लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होत आहे. तसेच ठाण्यात पुस्तक केंद्रांची संख्या कमी असल्याने वाचकांना पुस्तक प्रदर्शनांची वाट बघावी लागत आहे. – विनायक गोखले, ग्रंथमित्र