ठाणे : भिवंडी येथील एका स्मशानभूमीत जादूटोण्याचा प्रकार शनिवारी उघड झाला आहे. दोन महिलांचे छायाचित्र लिंबांवर चिटकविण्यात आले होते. याप्रकरणी गावातील पोलीस पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनंतर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अंधश्रद्धा निर्मुलनासाठी प्रयत्न होत असताना ठाणे शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडी शहरात जादूटोण्या सारखा गंभीर प्रकार उघड होत आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मुलनासाठी कायदे आहेत. त्यानंतरही असे प्रकार सुरुच असल्याचे या घटनेनंतर स्पष्ट होत आहे. भिवंडीतील पिंपळास गाव येथील स्मशानभूमीमध्ये लिंबांवर चिटकवून ते काळ्या कपड्यांमध्ये गुंडाळण्यात आल्याचे आढळून आले होते. घटनेची माहिती स्थानिकांनी गावातील पोलीस पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ कोनगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली.
याबाबत त्यांनी माहिती घेतली असता, गावातील दोनजणांनी हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याविरोधात त्यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ (२), ३(३) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.