eco friendly Ganesh idols demand in Thane : गणेशोत्सवाची तयारी सुरू होत असताना, घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पारंपरिक शाडूमातीबरोबरच यंदा इतर नैसर्गिक साहित्य वापरून तयार करण्यात आलेल्या मूर्तींचा पर्याय उपलब्ध झाला आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि पाण्याचे प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने नागरिक अधिक जागरूक झाले असून, पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची मागणी वाढत असल्याची माहिती ठाणे शहरातील काही गणेशमूर्तिकारांनी दिली.
प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) बंदीचा विषय गेले अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपुरक बनवण्यावर भर दिला जात होता. त्यानुसार, जलस्त्रोतांचे होत असलेले प्रदुषण लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) गणेशमूर्तींवर बंदी घातली होती. परंतू, यानिर्णयामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गणेश मुर्तीकारांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर ९ जून ला प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या गणेशमुर्तींवरील बंदी उठवली. या निर्णयामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह गणेशमुर्तीकारांना देखील काहीसा दिलासा मिळाला.
परंतू, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तीमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांविषयी सातत्याने होत असलेल्या चर्चा आणि जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृकता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेशमुर्तींना मोठ्याप्रमाणात मागणी असल्याची माहिती ठाण्यातील एका गणेशमुर्तीकारांनी दिली. यंदा पर्यावरणपूरक गणेश मुर्तींमध्ये शाडूमातींसह आणखी काही पर्याय उपलब्ध झाले आहेत. या मुर्ती पीओपी आणि शाडू मातीप्रमाणे सुबक आणि आकर्षक असल्यामुळे नागरिकांच्या पसंतीस पडत आहेत. ठाणे, डोंबिवली, कल्याण सह इतर शहरात देखील या मूर्तींना मोठ्याप्रमाणात मागणी असल्याची माहिती गणेशमुर्तीकारांनी दिली.
– पर्यावरणपूरक गणेशमुर्तींमध्ये हे पर्याय उपलब्ध…
शाडूमाती गणेशमूर्ती – शाडूमाती ही एक नैसर्गिक, बारिक, गाळयुक्त चिकणमाती आहे. ही माती मऊ असते आणि या मातीला सुलभपणे आकार देता येतो. त्यामुळे या मातीपासून तयार केलेली गणेशमूर्ती पाण्यात सहज विरघळणारी असते.
कोकोपीट गणेशमूर्ती – कोकोपीटपासून गणेशमूर्ती तयार केली जाते. ही मूर्ती वजनाने हलकी आणि पर्यावरणास अनुकूल असते. या मूर्तींना हळद, कुंकू आणि चंदण याचा वापर करुन रंग दिला जातो. कोकपीटचा वापर झाडांच्या संवर्धनासाठी केला जातो, अशी माहिती मूर्तीकार एकनाथ राणे यांनी दिली.
कागद आणि लगद्याची गणेशमूर्ती – कागद आणि लगद्याचा वापर करुन तयार केलेल्या गणेशमुर्तीचे वजन पीओपी मूर्तीपेक्षा कमी असते. ही मूर्ती पाण्यात सहज विरघळते. ही मूर्ती देखील आकर्षक आणि सुबक असते.
लाल मातीपासून तयार केलेली गणेशमूर्ती – शाडू मातीच्या मूर्तीला पर्याय म्हणून लाल मातीच्या मूर्तीकडे पाहिले जाते. ही गणेशमुर्ती वजनाने थोडी जड असते. या मूर्तीचे विसर्जन काही तासांतच होते. विसर्जनानंतर या मूर्तीची माती झाडांसाठी वापरता येते.
– असे आहेत मूर्तींचे दर…
शाडूमातीच्या मूर्तींच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति १ फुटामागे ५०० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी शाडूमाती १ फुटाच्या मूर्तीचे दर १८०० रुपये इतके होते. यंदा शाडूमाती १ फुटाच्या मूर्तीचे दर २५०० रुपये आहेत, अशी माहिती ठाण्यातील वर्तकनगर भागातील गणेशमूर्तीकार साक्षी गांधी यांनी सांगितले. तर, लालमाती, लगद्याच्या मूर्ती तसेच कोकपीट पासून तयार करण्यात आलेल्या एक फुटांच्या मूर्तींची किंमत २५०० ते २६०० रुपये इतकी आहे.