डोंबिवली : मागील दोन महिन्यांपासून डोंबिवलीत विविध प्रकल्प, पुतळ्यांचे अनावरण, उद्घाटनांचे कार्यक्रम संध्याकाळच्या वेळेत होत आहेत. या कालावधीत रस्ते वाहतुकीत बदल करण्यात येत आहे. या रस्ते वाहतूक बदलामुळे शहरातील रस्ते वाहन कोंडीत अडकत असल्याने प्रवासी या सततच्या उद्घाटन कार्यक्रमांमुळे खूप त्रस्त आहेत.

विशेष करून नोकरदार वर्ग संध्याकाळी कामावरून परतल्यानंतर घरी रिक्षा, आपल्या खासगी वाहनाने जाताना या कार्यक्रमांमुळे शहरातील कोंडीत अडकून पडतो. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर नागरिकांच्या दिखाव्यासाठी हे कार्यक्रम आयोजित केले जातात. आपल्या कार्यक्रमांमुळे वाहतुकीला अडथळा होतो याचे थोडेही भान राजकीय आयोजकांकडून ठेवले जात नसल्याने डोंबिवलीतील नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

दोन महिन्यापूर्वी डोंबिवली पूर्वतील एमआयडीसी भागात छत्रपती शिवाजी महाराज चौक (घरडा सर्कल) येथे अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे करण्यात आले. या पुतळ्याच्या बाजुला सावळाराम महाराज क्रीडासंकुलाचे १९ एकरचे मैदान उपलब्ध होते. तरीही अश्वारुढ पुतळा अनावरणाचे कार्यक्रम घरडा सर्कलमधील चारही बाजुचे रस्ते बंद करून संध्याकाळच्या वेळेत आयोजित केला होता. डोंबिवली शहराच्या प्रवेशव्दारावरील घरडा सर्कल रस्ता बंद केल्याने शिळफाटा रस्ता, कल्याण दिशेकडून येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाने जावे लागले होते. त्यामुळे पर्यायी मार्ग वाहतूक कोंडीत अडकून पडले होते.

काही दिवसापूर्वी सावळाराम महाराज क्रीडासंकुलात पालिकेच्या एकूण आठ प्रकल्पांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. हा कार्यक्रम भव्य व्हावा यासाठी डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात पाऊस रोधित भव्य मंडप उभारण्यात आला होता. हे काम पाच ते सहा दिवस सुरू होते. यामुळे क्रीडाप्रेमी नागरिकांना पर्यायी मैदानांचा वापर करावा लागला होता. या सततच्या उद्घाटन कार्यक्रमांमुळे आपल्या क्रीडा सराव, प्रशिक्षणावर गदा येत असल्याने क्रीडाप्रेमी तीव्र नाराजी व्यक्त करत होते.

डोंबिवली पूर्वेत रेल्वे स्थानक भागात इंदिरा चौकाजवळ शिवसेना मध्यवर्ति शाखेच्या समोर मेघडंबरीतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण गुरूवारी संध्याकाळी सहा वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात येत आहे. सकाळ, संध्याकाळ हा परिसर खासगी वाहने, रिक्षा, दुचाकी, बस यांनी गजबजलेला असतो. पलावा, शिळफाटा भागातील वाहने याच रस्त्याने धावतात. हा महत्वाचा रस्ता गुरूवारी दुपारनंतर शिवसेना शाखेसमोरील कार्यक्रमासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने डोंबिवलीतील व्यापारी, नोकरदार, स्थानिक रहिवासी यांच्यामधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पक्षीय कार्यक्रम असल्याने याविषयी कोणीही उघडपणे बोलण्यास तयार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कार्यक्रमांबरोबर शहरातील रस्ते रूंद करा, शहरात पावसाचे पाणी कुठे तुंबणार अशा पध्दतीने गटारे बांधा, अशा सूचना नागरिक करत आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेने शासन निधीतून ७५ लाख खर्च करून मेघडंबरीतील शिवरायांच्या पुतळ्याचे काम केले आहे. हा निधी आणण्यासाठी खासदार डाॅ. शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले होते.