डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर भागातील खंडोबा मंदिर परिसरात शनिवारी रात्री माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांचे समर्थक, अंगरक्षक आणि यापूर्वी विकास म्हात्रे यांचेच समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या हाणामारीच्यावेळी लोखंडी सळई, दांडके, दगड यांचा वापर केला. त्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्ते जखमी झाले.
विष्णुनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी यामधील काही जणांना ताब्यात घेतले आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या काळात माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या राजूनगर प्रभागातील आपल्या नातेवाईक कार्यकर्त्या बरोबर वाद झाला होता. या वादाची आणि आगामी कल्याण डोंंबिवली पालिका निवडणुकीची पार्श्वभूमी या वादाला असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांचे अंगरक्षक आणि भाजपचे राजूनगरमधील कार्यकर्ते मेघराज तुपांगे समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला. तुपांगे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ओमकार म्हात्रे, प्रमोद चव्हाण, महेश चव्हाण, अजय गोलतकर, अखिल निंबाळकर यांच्या विरुध्द गु्न्हा दाखल केला आहे. विकास म्हात्रे समर्थक अजय गोलतकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी उमेश भोईर, शत्रुघ्न मढवी, विशाल म्हात्रे, अशोक म्हात्रे, मेघराज तुपांगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या हल्ल्यात दोन्ही गटातील कार्यकर्ते जखमी आहेत.
माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी माध्यमांना सांगितले, शनिवारी रात्री आपण राजूनगर मधील एका विकासकाच्या कार्यालयात गेलो होतो. तेथे तुपांगे यांनी आपल्या अंगरक्षकाला धारदार नजरेने नजर दिली आणि शिवीगाळ केली. याप्रकरणाची माहिती देण्यास आपण पोलीस ठाण्यात गेलो. त्यानंतर तुपांगे समर्थकांनी आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला.
तर मेघराज तुपांगे यांनी माध्यमांना सांगितले, विकास म्हात्रे यांच्या अंगरक्षकाने आपणास शिवीगाळ केली. आपण समर्थकांसह घरी परतत असताना आपल्यावर विकास म्हात्रे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या १५ समर्थकांनी दगडी, दांडके यांनी आपणासह समर्थकांवर हल्ला केला. माझी सोनसाखळी हल्ल्याच्यावळी चोरण्यात आली. माझी चूक नसताना हा हल्ला करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या काळातील धुसफुसीचा राग माझ्यावर विकास म्हात्रे यांनी काढला. माझ्यावर अन्याय झाला आहे.आपण यापूर्वीच पोलिसांकडे जीवीला धोका असल्याची तक्रार केली आहे. पण आपणास पोलीस संरक्षण मिळाले नाही.
मिळालेली माहिती अशी, की राजूनगर भागात कल्याण डोंबिवली पालिकेची निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी मेघराज तुपांगे यांनी केली आहे. या प्रभागात मेघराज उभे राहिले तर विकास म्हात्रे आणि समर्थकांना ते मोठे आव्हान होईल. या चढाओढीतून ही धुसफूस आतापासून सुरू झाली असल्याची चर्चा आहे. मेघराज भाजपचे कार्यकर्ते असले तरी त्यांचे सर्व नेत्यांशी मैत्रीचे संबंध आहेत.
गुन्हा दाखल काही इसमांवर विष्णुनगर पोलीस ठाण्यात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी या गु्न्ह्याची गंभीर दखल घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.